Sunday, December 19, 2010

काका

डॉ. कविता कपूर नविनच या हॉस्पिटालमधे आल्या होत्या. हॉस्पिटलचा राऊंड घेऊन त्या आपल्या खुर्चीत बसल्या. पार थकून गेल्या होत्या त्या. शारिरीक थकव्या बरोबरच मानसिक थकवा सुद्धा जाणवत होता. या वेड्यांच्या हॉस्पिटलमधला राउंड पार दमवणारा होता.

त्यांनी नवीन आलेल्या पेशंटचा रेकॉर्ड मागवला. काकांचा तयार केलेला रिपोर्ट असिस्टंटनी त्यांच्या समोर ठेवला. त्यांनी त्यांची प्राथमिक माहिती लिहिली होती. किती व्यवस्थित रिपोर्ट होता तो. त्यात केलेले कॉलम, त्यात लिहिलेली माहिती. ते सर्व बघुन डॉ. कविताच्या मनात एकच विचार आला या काकांना काय त्रास असेल ? हे का या वेड्यांच्या हॉस्पिटलमधे आलेत ?

काकांशी प्राथमिक बोलण झालं, काहीच अंदाज येत नव्हता. काय झालेल असेल ? काही मिटिंग घ्याव्या लागणार. काकांना बाहेर बसायला सांगितल व बरोबर आलेल्या माणासाला विचारल त्यानी सांगीतल की काका कधी कधी एकटेच बोलत बसतात. हातवारे करतात. या केसचा नीट अभ्यास करावा लागणार होता. कारण काका खुप समतोल वाटले.
ते सोशल वर्कर होते. काही दिवसांनी त्यांनी वरचेवर हॉस्पिटलला यायला सुरुवात केली. त्यांची सर्वांशी ओळख झाली होती. कविताला यायला उशीर असला तर ते स्टाफ़ला मदत सुद्धा करायचे. पेशंटशी बोलायचे. त्यांनी हॉस्पिटलमधील पेशंटसाठी काही उपक्रम सुचवले आणि काही चालू केले.

पेशंटची मारामारी हा वेड्यांच्या हॉस्पिट्लमधला नित्याचाच प्रकार होता. पेशंट व्हायोलंट व्हायचे व मारामारी करायचे. अशा वेळी सरळ या पेशंटना बांधुन ठेवण व ट्रांक्विलायझर देण हाच उपाय असतो. पण काका या उपायाच्या नेहेमी विरुद्ध असायचे. ते त्या पेशंटशी गोड गोड बोलायचे आणि त्याला शांत करायचे. ही कला फ़क्त त्यांनाच जमलेली होती. त्यामुळॆ स्टाफ़ त्यांच्यावर खुष होता. ते हल्ली हॉस्पिटालसाठी खुप वेळ देत होते. काकांच्या बाबतीत एक गोष्ट कविताला जाणावली, काका तरुण पेशंटशी बोलताना, त्याला हाताळाताना फ़ार हाळवे होतात. एक १७-१८ वर्षाचा पेशंट हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट होत असताना काकांच्य़ा डोळ्यात तराळणार पाणी कविताच्या नजरेतुन सुटल नव्हत.

आज रविवार होता. खर तर रविवारची कविता नेहेमीच सुट्टी घ्यायची. हा एक दिवस घरासाठी द्यायचाच असा तीचा शिरस्ता होता. पण आज असिस्टंट सुट्टीवर होती, त्यामुळे आज येण भागच होत. नशिबानी पेशंट कमी होते.

डॉ. कविता आपल काम उरकून ऒपीडी बाहेर पडल्या या वेड्यांच्या हॉस्पिटलमधल काम पूर्ण केल, तरी एक मानसिक दडपण राहातच. एक कप चहा पिउन त्या घरी जायला निघाल्या. त्यांनी कार स्टार्ट केली आणि त्यांना ती मुलगी दिसली. ती काकांच्या बरोबर अनेक वेळा यायची. त्यांच्या बरोबर काम करायची. आज एकटीच आलेली होती. कवितानी ठरवल या मुलीला विचारायच काकांबद्दल. ती पेशंटाना भेटुन हॉस्पिटलमधुन बाहेर पडत होती. कवितानी तीला हाक मारली व गाडित बसातला सांगीतल व म्हणाल्या "अग ये न माझ्याबरोबर, मी तुला सोडते पाहिजे तीथे " या रणरणात्या उन्हात १० मिनीट चालल्यावर मुख्य दरवाजा आणि त्यानंतर १०-१५ मिनीट चालल्यावर बस स्टॉप वर पोहोचणार. मग बससाठी ताटकळात उभ राहायच. जास्त आढेवेढे न घेता धन्यवाद म्हणुन ती सुद्धा आत बसली. कवितानी बोलताना काकांचा विषय काढ्ला. आणि माहिती मिळाली.

काकांच्या कोणा ओळ्खीच्या मुलाची ती मैत्रीण होती. मुलगा अमेरिकेत होता. त्यामुळे काकांकडे लक्ष द्यायच, त्यांना दर आठवड्याला भेटायच काम या मुलीनी, "मोनानी" स्वतःहुन अंगावर घेतलेल होत. कधी ते दोघ त्या मुलाच, मनोहरच पत्र एकमेकांना वाचून दाखवत. कधी त्याच्या कविता वा गोष्टी वाचत. काका या मुलीवर फ़ार खुष असायचे.

काकांची ओळख या मनोहर मुळे झाली. मनोहर या मुलाची अनेकांना पत्र येत. अशीच पत्र मोनाला येत. पत्र इतकी छान लिहिलेली असत. त्यात कुठेही आक्षेपार्ह मजकूर नसे. किंबहुना मोनानी भावी आयुष्यात सुखी व्हाव यासाठीच सल्ले असत. मनोहरचा देवा धर्मावर खुप विश्वास. तो नेहेमी मोनाला या पत्रांमधुन देवा बद्दल लिही. मोनासाठी प्रार्थना करी. मोनाच व तीच्या नवर्‍याच पटत नव्हत. मोनाचा घटस्पोट घेण्याचा विचार होता. पण या मनोहरमुळॆच ती हळु हळू संसाराचा विचार करु लागली. मनोहरनीच काकांना मोनाची भेट घेण्यास सांगीतल. नंतर काकांनी तीची व तीच्या नवर्‍याची भेट घेतली. अनेक बैठका झाल्या व मोनाचा संसार सुरळित चालू झाला. आज तीला दोन मुलं आहेत नवरा बॅंकेत नोकरी करतो, ती स्वतः एका कॉलेजला लेक्चरर आहे. मोना म्हणाली "मनोहर व काकांमुळेच मी आज सुखी आहे."

पण काही लोकांना काका वेडे वाटले सिझोफ़्रेनिक वाटले आणि मग यथावकाश काका या हॉस्पिटलमधे चकरा मारु लागले. थोड्या दिवसांचीच ट्रीटमेंट होती. काका घरी एकटेच होते. त्यामुळे काका वेडे आहेत वा नाही हे सांगु शकणार कोणीच नव्हत. आणि काकांनी या ठिका्णी येताना कधीच आढेवेढे घेतलेले नव्हते. मोना त्यांना भेट्ली म्हणाली की "काका मी तुमच्या बरोबर हॉस्पिटालला येत जाईन आणि मनोहरची पत्र पण तुम्हाला वाचुन दाखवीन" काका मनापासून हासले होते. जर मनोहरच्या आठवणीनी काकांना बर वाटत असेल तर काय हारकत आहे इतक करायला अस मोनाला वाटल.

हॉस्पिटलच्या रेकॉर्डप्रमाणे काकांना "स्प्लिट पर्सनॅलिटीचा" त्रास होता. कविता विचार करु लागली. काकांची स्प्लीट पर्सनॅलिटी आहे ? स्प्लिट पर्सनॅलिटिच कोणतच लक्षण काकांमधे दिसत नाही. इथे व्हिजिटींग रुममधे बसलेले असताना कधीच स्वतःशी बोलत नाहीत वा हातवारे करत नाहीत. मोना आणि ते दोघच असताना काका मनोहरबद्दल बोलतात इतर वेळी नाही. काही तरी वेगळ आहे. कविताला कशाचाच संदर्भ लागत नव्हता. तीनी मोनाला तीच्या घराजवळ सोडल. व म्हणाल्या "मोना आपल्याला काही तरी काकांसाठी कराव लागेल. काका या अशा परिस्थितीत या वातावरणात जास्त दिवस राहाण चांगल नाही. इथे मन उदास होत राहात. मनावर वाईट परिणाम होईल." मोना सुद्धा म्हणाली की " डॉक्टर खरच काही तरी करायलाच हव. माझ्याकडुन होईल ती सर्व मदत करीनच."

कविताला काहीच सुचत नव्हत काय कराव ? काका इतके समतोल वाटायचे की त्यांना काही मानसिक त्रास असेल अस नाही वाटायच. हॉस्पिटलमधली काही कामं त्यांनी स्वतःहुन अंगावर घेतलेली होती. सकाळचा योगवर्ग, संपूर्ण पत्र व्यवहार, पेशंटच्या नातलगांशी बोलणं आणि याशिवाय लहान मोठी अनेक कामं ते स्वतःहुनच करायचे. त्यांच वाचन खुप होत. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत ते चांगल्या प्रकारे बोलु व लिहु शकायचे. ते कथा लिहायचे , कविता करायचे आणि लेख लिहायचे. अशा व्यक्तिमत्वाच्या माणासाला हा त्रास का झाला असेल? कवितानी ही केस सोडवायचीच असा निश्चय केला.

आधी बाहेरुन माहिती मिळवू असा विचार करुन तीनी हॉस्पिटलमधल्या कागदपत्रांवरुन काकांच्या घरचा पत्ता मिळवला आणि जाऊन शेजारी पाजारी चौकशी केली. नाही, काहिच वाईट नाही समजल. काका एक प्रोफ़ेसर होते, त्यांच्या विद्यार्थांचे ते खुप लाडके होते. विद्यार्थिनी तर काकांबद्दल बोलताना रडत होत्या. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना कविता भेटली पण सर्वांच म्हणण की ते अतिशय चांगल्या विचारांचे समतोल होते. त्यांच त्यांच्या विद्यार्थांवर खुप प्रेम होत. काकांची स्वतःची इंस्टीट्युट होती. त्या इंश्टीट्युटमधे काम करणार्‍या स्टाफ़च मत त्यांच्या बद्दल चांगल होत. ते एका कॉलेजमधे शिकवायचे तीथे फ़ार चांगला रिपोर्ट मिळाला.

या सर्वात मनोहरचा काही पत्ता कविताला मिळाला नव्हता.

काकांचा उल्लेख मनोहरच्या पत्रांमधे असायचा. कवितानी मनोहरच्या पत्रांचा अभ्यास केला. अतिशय सुसुत्र व सुसंगत विचार या पत्रव्यवहारात होते. एकच सर्व पत्रांमधे साम्य होतं, मनोहर कोणालाही भेटायला तयार नव्हता. अथवा फ़ोन करायला तयार नव्हता. कोणत्याही पत्रात लेखकाचा बॅलन्स गेलेला नव्हता. कोणत्याही पत्रात कोणाला दुरुत्तर नव्हत. खर तर ती पत्र पाहिली आणि कवितालाच मनोहरला भेटण्याची फ़ार इच्छा झाली. कसा या केसचा गुंता सोडवावा ?

काकांशी बोलाव ? पण कस ? कवितानी ठरवल की काकांना सरळ विचारायच नाही. काकांचे जुने लहानपणाचे मित्र शोधायला तीनी सुरुवात केली. आणि एक खुप जुना सहकारी मिळाला. तो खुप आजारी होता. त्याच्या मुलानी त्या माणासाची सर्व प्रॉपर्टी घेऊन त्यांना हाकलल होत. काकांनीच या वृद्ध मित्राला वृद्धाश्रमात आणालेल होत. तेच त्याच्याकडे नेहेमी जायचे व हव नको सर्व पहायचे. कविता व मोना त्या वृद्धाश्रमात जाउन त्यांना भेटल्या. त्यांच्याकडुन समजली ती माहिती अशी

काका एक स्कॉलर होते. पूर्ण शिक्षण त्यांनी चांगल्या कॉलेजमधुन पुर्ण केल. मास्टर डिग्री हाती पडताच त्यांना चांगल्या कॉलेजमधे नोकरी मिळाली. साहजिकच त्यांना मुली सांगुन यायला लागल्या. आणि त्यात त्यांना एक इंदूरची मुलगी “रश्मी“ चांगली वाटली. मुलगी ग्रॅज्युएट होती दिसायला बरी होती, खुप गोरी होती. यथावकाश लग्न झाल. लग्नानंतर हनिमुनला म्हणुन सर्व दक्षिण भारत टुर झाली. घरी आल्यावर काका कामावर जायला लागले व रश्मी घरी राहायला लागली. कधी कधी तीचे माहेरचे लोक यायचे, त्यावेळी मात्र रश्मी खुप डिस्टर्ब झालेली असायची. असेच काही महिने झाले आणि एक दिवस रश्मीला दिवस गेले आहेत अस लक्षात आल. काका म्हणाले की आपण सर्वात चांगल्या गायनॉकोलॉजिस्टकडे जाऊ पण रश्मी म्हणायला लागली की मला इतक्यात मुल नको आहे. डॉक्टरकडे यायला ती तयारच नव्हती. काका म्हणाले की पण आता दिवस गेले आहेत आता काय करणार ? दूसर्‍या आठवड्यात रश्मीचे आई-वडिल आले व रश्मीला माहेरी नेतो जरा विरंगुळा मिळेल अस म्हणाले व घेऊन गेले. काका रोज फ़ोन करायचे रश्मी सावरलेली वाटली. काकांना मुलगी हवी होती. रश्मीला ते तस फ़ोनवर म्हणाले पण तीनी फ़ोन कट केला. या अशा वागण्याची काकांना सवयच झालेली होती.

काका रोज आपल्याला होईल ते मुल कस असेल याच विचारात असायचे. त्यांना थोडी मनोराज्य करण्याची सवयच होती.
हळु हळू काकांना येणारे फ़ोन कमी होत गेले. काकांनी फ़ोन केला तर रश्मी बाहेर गेली आहे अथवा झोपली आहे. अशी वा उडवा उडवीची उत्तर दिली जात होती. आधी कॉलेजची परिक्षा व नंतर सक्तीची इलेश्कन ड्युटी आलेली होती. त्यामुळे सुट्टी घेऊन जाण शक्य नव्हत.
काका एक दिवस दमुन झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडल. ते एका हॉस्पिटलमधे आहेत व एक लहान मुल त्यांच्याकडे पाहुन केविलवाण रडतय. काका जागे झाले त्यांना चैनच पडेना. हे मुल आपलच आहे अशी मनोमन त्यांना खात्री पटली. जागे झाले तरी ते लहान मुल त्यांच्या डोळ्यासमोरुन जात नव्हत. नंतर तर झोप येण शक्यच नव्हत. त्यांनी सकाळी रश्मीला फ़ोन केला पण तीनी फ़ोन कट केला. काकांच कशातच लक्ष लागत नव्हत. त्यांच्या मित्रांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी काकांनी स्वप्नावर विश्वास कसा ठेवतोस म्हणुन टर उडवली. पण हळू हळू मित्रांच्या लक्षात येत गेल की काकांच कशातच लक्ष नाही. आणि मग काकांनी इंदूरला स्वतःच जायचा निर्णय घेतला. काका जेव्हा पोहोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती ते सरळ रशीच्या घरी गेले. तीच्या वडलांनी सांगीतल की रश्मी तुमच्या जवळ राहायला तयार नाही आणि थोड्याच दिवसात घटस्पोट घेणार आहे. तीच दुसर्‍यावर प्रेम आहे. बाकी काहीच सांगायला तयार नव्हते. काकांनी विनंती केली की झालेल मुल मात्र त्यांना मिळाव. नाही तरी अ‍ॅबॉरशन करायला उशीरच झालेला होता. काकांची ती अट मान्य केली गेली.

काकांनी हा धक्का कसा पचवला ते त्यांच त्यांना माहिती. पण त्यानंतर काही महिन्यांनी काकांना कळावल गेल की तुम्हाला मुलगा झालाय. लगेच काका इंदूरला गेले. तो खुप गोरा व देखणा मुलगा पाहुन काका सर्व दुःख विसरले. काका थोड्याच दिवसात त्या मुलाला घरी घेऊन आले. इतक्या लहान मुलाला आईशीवाय वाढवण सोप नव्हत पण काकांनि ते काम केल. जसा तो मोठा होईल तसे त्याला लागणारे कपडे, खेळणी सर्व काका आणायचे. पण ३ वर्षात लहानशा आजारपणाच निमित्त होऊन तो मुलगा गेला. काका वेड्य़ासारखे झाले. पण त्यातुनही ते सावरले. त्यांना मुलाचे शेवटाचे शब्दच आठवत होते. "बाबा मला मरायच नाही" काकांनी ठरवल या मुलाला आपल्या मनातच वाढवायच. कधी कधी ते एकटेच त्या खेळाण्यांशी खेळायचे. या आपल्या काल्पनिक मुलाशी बोलायचे. आजुबाजुची मुल गोळा करुन त्याचे वाढदिवस साजरे करायचे. लोकांना वाटल काकांच्या डोक्यावर परिणाम होतोय. पण काका इतर वेळी फ़ार नॉरमल वागायचे.

याच मुलाच नाव मनोहर. याला मित्र मैत्रीणी, नातलग मिळा्वेत व त्याची आठवण जागी राहावी याच साठी काका त्याच्या नावानी पत्र लिहायचे.
मनोहर ज्या पत्रातुन कविता, कथा व लेख लिहायचा ते काकांचेच होते. त्यांनी केलेल सर्व साहित्य ते या मुलाला अर्पण करत होते.

कविता आपल्या कंसल्टींग रुम मधे बसली होती. आज मात्र ती मनानी पारच खचुन गेली होती. सर्व पेशंट तपासुन झाले. कवितानी डोळे मिटले आणि इझी चेअरवर मान मागे टेकली. काकांचाच विचार तिच्या मनात येत होता. एक चाकोरी बाहेरची केस ती हाताळात होती. कशी हाताळावी ही केस ? काकांशी आता बोलावच लागणार होत. या अवस्थेत त्यांना जास्त दिवस ठेवणं बरोबर नव्हत. असिस्टंटनी आणालेला चहा त्या पीत होत्या आणि त्याच वेळी दारावर ट्कटक वगैरे न करता मोना सरळ आत आली."डॉ. मला तुम्हाला ताबडतोब भेटायच आहे. येऊ ?" कविताला खर तर तीच्याशीच बोलायच होत.

मोनानी एक पत्र कविताच्या हातात दिल. अक्षरावरुन कवितानी लगेच ओळखल की हे पत्र काकांच आहे. पत्र अस होत.

"चि. मोना,
तुला जोशी कडुन सर्व समजल असेलच. मीच त्याला सांगितल होत सर्व सांगायला. आता तुला मनोहरची पत्र येणार नाहीत. मला साहानुभुतीची बिलकुल गरज नाही. मी मनानी हळावा असलो तरी खंबीरसुद्धा आहे. मला समजतय की माझ वागणं हे अनैसर्गिक आहे. माझ्या मनातुन मनोहर कधीच दूर होऊ शकत नाही. पण आता यापुढे मात्र मी त्याच्या नावानी कधीच पत्र पाठवणार नाही.
आज मनोहर जाऊन १५ वर्ष झाली. मी या दिवशी नेहेमीसारखी सगळी कामं करतो. लहान मुलाच्या मृत्युच दुःख फ़क्त त्याच्या आई वडलांना होत असत. बाकीच्या लोकांना त्याची साधी ओळाखसुद्धा नसते. मग दुःख कस होणार ?


असाच मनोहरच्या आठवणीत मी पार बुडालो होतो. मनोहर जाऊन २ वर्ष झाली होती. ऑफ़िसमधुन बाहेर पडलो एकटाच चालत चालत गेटवे ला आलो. एका बाकावर नुसताच बसुन राहिलो. या काळात मला एकच व्यसन लागल होत. लहान मुलांना बघायच. त्यांच्यात माझ्या मनोहरला शोधायच. माझी खात्री होती कि मनोहर परत जन्म घेणार व मला भेटणार आहे. कडेवर मुल घेतलेली बाई दिसली की सर्वांच लक्ष जात ते त्या बाईकडे पण माझ लक्ष जायच ते त्या लहान मुलाकडे. हा तर माझा मनोहर नाही न ?
आज मी त्या बाकावर बसुन नुसताच बागेत फ़िरणार्‍या लोकांकडे बघत होतो. मला मनोहरची खुप आठवण आली. परत परत डोळे भरुन येत होते. समोर माणसं फ़िरत होती. फ़ेरीवाल्यांचे व वाहनांचे आवाज होत होते. मी मात्र या सर्वापासुन खुप खुप लांब होतो. अलिप्त झालो होतो. माझ्याच विचारांमधे आणि दुःखात पार बुडालो होतो. परत परत डोळे भरुन येत होते. नेहेमी सारखी देवाला प्रार्थना केली "देवा एकदा तरी माझ्या बाळाची व माझी भेट घडवुन आण"


समोर एक फ़ॉरेनर बाई लहान मुलाला हाताला धरुन नेत होती. दीड दोन वर्षाचा तो लहान मुलगा मजेत दुडुदुडु धावत होता. मी सवईनी त्या मुलाकडे बघीतल. थोडे पुढे गेलेल ते मुल एकदम मागे फ़िरल त्यानी आईचा हात सोडुन दिला. चमकुन त्यानी माझ्याकडे बघितल. आणि त्याच दुडुदुडु चालीनी धावत माझ्याकडे आल. त्या मुलानी दोन्ही हातानी माझॆ डोळे पुसले. माझ्या गळ्याला गच्च मिठी मारली. माझ्या गालाची पापी घेतली. आणि मागे फ़िरुन जस आल तस एकदाही मागे न बघता, ते मुल परत त्याच चालीनी परत गेलं. देवानी माझ ऎकल होत. माझ्या मनोहरची भेट घडवली होती.
आजसुद्धा तो मुलगा, त्याची गळ्यात मिठी, त्याचा स्पर्ष, त्याची प्रेमळ नजर व त्याची पापी मला सर्व आठवतय.

मोना आता मनोहरच्या आठवणी व या आठवणीवरच मी पुढच आयुष्य जगणार आहे."

...... तुझा काका