मी
थोडा मुलीसारखा नाजुक दिसतो.
आवाज पण
मुलीसारखा आहे. त्यामुळे
सगळेच मला त्रास देत असतात.
बायल्या हे
नांव तर मला कधी पडल हेच आठवत
नाही. आता
तेच माझ टोपण नाव झाल आहे.
चालताना माझी
कंबर मुलींसारखी हालत असते
अस सगळे म्हणतत. मी
खुप प्रयत्न केला पण नाही नीट
चालता येत. रस्त्यानी
जायला लागलो तर लोकं बघतात व
एकमेकांकडे बघुन हासतात.
घाण जोक करतात.
मी लक्षच देत
नाही.
एखाद्यामधे
काही शारिरीक कमतरता असली तर
समाजात तो माणूस एक चेष्टेचा
विषयच होतो. लहानपणापासुन
मला मित्रांनी, शेजारपाजारच्या
लोकांनी, शिक्षकांनी
, रस्त्यातुन
येता जाता कोणीही त्रास दिलेलाच
आहे. सुरवातीला
खुप राग यायचा. आता
सगळ्याचीच सवय झालेली आहे.
मनच कोडग होऊन
गेल आहे. होस्टेलला
आल्यापासुन तर हा त्रास रोजचच
सुरु झाला आहे. आता
हेच माझ आयुष्य आहे.
मनानीच ते
मान्य केलेल आहे.
किती
दिवस झाले सतत खुप थकवा वाटतोय.
रोज थोडा थोडा
ताप येतोय. जागच
उठुच नाही अस वाटत. मनात
कुठे तरी खुप खुप भिती वाटत
राहते. थकव्यामुळे
उन्हाचा त्रास होतो व डोळ्यांना
प्रकाश नकोसा वाटतो.
हल्ली रात्रीचाच
बाहेर जातो. खानावळीत
जातो पटापट जेवतो, लगेच
परत.
खर
तर मला रात्री बाहेर जायची
खुप खुप भिती वाटते.
भितीनी चेहरा
पांढरा फटफटीत होतो.
घशाला कोरड
पडते. सतत
तहान लागते. होस्टेलमधली
मुलं मला यावरुन खुप हासतात.
विश्या तर
फारच हासतो. त्याला
कसलीच भिती नाही, म्हणुन
काय इतरांना हासण्याचा मक्ता
मिळाला आहे का ? रात्री
केव्हाही बाहेर जातो.
सिनेमा,
नाटकं इतकच
कशाला तमाशासुद्धा बघतो.
आणि मग आल्यावर
त्यातले आचकट विचकट विनोद
मित्रांना रंगवुन रंगवुन
सांगतो. शी
! किळस
येते अगदी. कसले
कसले घाण जोक. कसे
या सर्वांना आवडतात काय माहिती
? पण मला
विश्या आवडतो. प्रेम
आहे माझ त्याच्यावर.
मी
कालच त्याला म्हणालो "विश्या
उद्या आमावास्या आहे.
रात्री उशीरा
बाहेर पडु नकोस. होस्टेलच्या
मागच्या बाजुला असलेल्या
विहरीजवळ गेल्या महिन्यात
एक जण मेलेला सापडला आहे.
विश्या
खदखदुन हासला. त्याचा
चेहरा मग्रुर झाला.
कपाळावरची
व मानेवरची शिर तट्ट फुगली.
मला झटकुन
देत म्हणाला
“उद्या
जाऊन बघतोच तीथे. मला
नाही कसली भिती वाटत"
माझ्या
अंगावर काटाच आला.
तो
पुढे म्हणाला. “मला
कसलीच भिती वाटत नाही.
उद्या तूच ये
बरोबर"
हे
वाक्य म्हणताना त्याचा चेहरा
गर्वानी फुलुन आला. दोन्ही
भुवयांमधली उभी रेषा जास्तच
जाड दिसली. मानेच्या
शीरा तटतटुन फुगलेल्या असल्या.
त्या विश्याच्या
एकुण मग्रुर चेहऱ्याला साजेशाच
वाटल्या. मॅनली
वाटला त्यामुळे.
मला
जाम भिती वाटते. मी
नाही जाणार असल्या ठिकाणी.
आज तर आमावास्या
आहे. जरा
लवकरच जातो जेवायला.
त्या खानावळवाल्या
काकु पण मला जरा जास्तच त्रास
देतात. रात्री
माझी प्लेट नेहेमी उशीरा
लावतात. मला
यायला उशीर होतो. रात्री
नऊ वाजता खानावळ सुरु होईल.
चला निघतो
आता. नऊ
वाजत आले.
मला
कोणी मित्र नाहीत.
माझ्याबरोबर
यायची सर्वांना लाज वाटते.
गांगुली तर
म्हणतो "शी
! तेरे
साथ काैन आयेगा. सब
हसेंगे मुझे" मी
एकटाच रस्त्याच्या कडेकडेनी
जातो. आईनी
सांगितल आहे. कडेनीच
जा. आई
सांगते ते नेहेमीच बरोबर असत.
तीनी सांगितल
तस, कडे
कडेनी व खाली बघत, नाकासमोर
चालत, सरळ
खानावळीत जातो.
“काकु,
मी आलो जेवायला
वाढता का ?”
“अग
बाई. मुकुंदा,
तू आलीस.
बस बस"
हे
बघा असा हे सगळे त्रास देतात.
"मुकुंदा,
तुझी खुर्ची
रिकामी नाही थांब थोडा"
कोपऱ्यातली
खुर्ची ही माझी ठरलेली जागा
आहे. तीथे
कोणी बसलेल असल, तर
तो माणूस जाईपर्यंत मी बाजुला
ऊभा राहतो. तीच
खुर्ची मला लागते. माझ्या
खुर्चीत बसलेला जायला थोडा
जास्त वेळ लागला. मग
मी बसलो.
मी
बसलो की थोडाच वेळात बळवंत
येतो. हे
नेहेमीचच आहे. तो
माझ्यासमोरच्या खुर्चीत
बसतो. काही
तरी अगम्य बोलत राहतो.
मी गप्पच बसतो.
त्याला माझ्या
उत्तराची आपेक्षाच नसते.
मी खाली मान
घालुन जेवत असतो. बळवंत
बोलत राहतो. माझ्याशी
आवर्जुन बोलणारा हाच एकमेव
मित्र. खानावळीत
येतो पण जेवत नाही. आजही
तसच झाल. बोलत
होता. मला
जेवण जात नव्हत. तहान
लागलेली होती. पाण्याची
बाटली तोंडाला लावली आणि सगळी
संपवली. तेव्हढ्यात
खानावळीत विश्या शिरला.
सरळ आला व
माझ्या समोरच्या खुर्चीत
बसला. त्याला
पाहुन बळवंत हासत हासत निघुन
गेला.
विश्या
मला हळु आवाजात बोलला
"आज
रुमवर रुबीला बोलावल आहे.
तू आज बाहेर
झोप"
“विश्या,
माझ्या रुमवर
हे नको"
विश्याचा
मग्रुर चेहरा जास्तच मग्रुर
झाला. डोळे
आग ओकत होते.
“बायल्या,
साल्या,
तुला आजुन मी
किती वाईट आहे हे माहिती नाही"
तो
पटापट जेवला व बाहेर गेला.
मी हात धुतले.
उठावस वाटतच
नव्हत. विश्या
रुबीला नक्कीच घेऊन येणार.
मला धरुन
मारेल, काय
वाटेल ते करेल व बाहेर काढेल.
कसा बसा
खानावळीतुन नाईलाजानी बाहेर
पडलो.
उशीर
झालेला होता. दाट
काळोख. रस्त्यावर
तुरळक दिवे लागलेले होते.
खुप वळणं
अंधारीच होती. या
रस्त्यावर रहदारी नसतेच.
मी कडेकडेनी
चालत होतो. कोपऱ्यावर
विश्या उभा होता. मला
भितीच वाटली. तसच
मागे पळुन जावस वाटत होत.
विश्या दोन
ढेंगा टाकुन माझ्याजवळ आला.
मला
म्हणाला "बऱ्या
बोलानी सांग, काय
करणार आहेस ?”
मी
म्हणालो "विश्या
मला खुप भिती वाटते. आज
आमावास्या आहे. रात्री
भुतं फिरत असतात"
विश्या
विचित्र हासला. त्या
काळोखात त्याचा चेहरा जास्तच
उग्र वाटला. त्यानी
माझा हात पकडला व मला ओढल.
म्हणाला आता
तुला होस्टेलच्या मागे नेतो.
दाखव मला कुठे
आहे भूत. मी
खुप घाबरलो. थरथर
कापायला लागलो. विश्यानी
खिशातुन चाकू बाहेर काढला.
म्हणाला
"चल
चुपचाप, नाही
तर खुपसुन टाकीन"
मी
भितीनी बेशुद्धच पडणार होतो.
म्हणालो विश्या
चाकू ठेव खिशात. मी
येतो तुझ्याबरोबर पण मला
प्रॉमिस कर तू मला सोडुन पळुन
जाणार नाहीस. मी
त्याचा हात घट्ट पकडला.
त्यानी चाकु
खिशात ठेवला व मला म्हणाला
"किती
भितोस. भितीनि
हात थंड पडला आहे"
खरच
माझा हात थंडच असणार.
विश्या कशाला
खोटं बोलेल ? विश्याचा
हात किती उबदार होता.
हवा हवासा
उबदारपणा.
विश्या
म्हणाला "चल
दाखव भुत"
भूत
काय मुद्दाम जाऊन बघण्याची
गोष्ट आहे का ? मी
विश्याचा हात घट्ट पकडला होता.
तो जवळ जवळ
मला खेचतच नेत होता.
होस्टेलच्या
मागच्या बाजुला खुपच अंधार.
मला खुप भिती
वाटत होती. तोच
जवळच काही तरी आवाज झाला.
कोणी तरी
हासल्यासारखा. मी
खुप घाबरलो. विश्याला
घट्ट मिठी मारली.
घाबरत
म्हणालो “विश्या भूत आलं.
आता ते आपल्याला
खाणार"
विश्या
परत तसाच बेफिकीर हासला.
मला म्हणाला
किती घाबरतोस. मी
टॉर्च आणला आहे. बघु
कोण आहे. त्यानी
टॉर्च टाकला. जवळच्या
झाडाखाली कोणी तरी बाई व तीच्या
बाजुला एक माणूस उभे आहेत अस
वाटल. विश्यानी
त्याचा चाकू काढला व धीटपणे
विचारल
"कोण
आहे ?”
माझ
लक्ष विश्याकडे गेल.
टॉर्चच्या
थोड्या रिफ्लेक्ट झालेल्या
प्रकाशात त्याचा चेहरा भयानक
दिसत होता. मोठे
व बेफिकीर डोळे, कपाळावरची
उद्दाम शिर व सर्वात महत्वाची
मानेवरी शिर. आज
प्रथमच ती शिर मी इतक्या जवळुन
बघत होतो. तट्
तट् उडत होती. माझ्या
नकळत मी त्याच्या जवळ गेलो.
तोंड उघडल.
चारही सुळे
अचानक बाहेर आले व त्याच्या
मानेत घुसले.
विश्या
मला झटकत होता पण माझी ताकत
वाढत होती. त्याची
कमी होत होती. विश्या
माझ्या हातात लुळा पडला.
ती अंधारातली
बाई पुढे आली. मी
विश्याला तीच्या स्वाधिन
केल.
“आई,
किती दिवसांनी
भेटलीस"
तीनी
माझ्या डोक्यावरुन हात फिरवला.
ती व बळवंत
विश्याला घेऊन निघुन गेले.
आता मला ताकद
आली होती.
भराभर
पुरुषासारखा चालत मी होस्टेलला
आलो व झोपुन गेलो.
--- निरंजन