Saturday, May 30, 2015

पंचायत....

माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट

प्रत्येक लहान मुलाला आपल्या वडलांबाबत प्रचंड अभिमान असतो. घरात त्याला आपल्या वडलांचा अधार वाटतो पण काही अभागी मुलांना वडील असुन त्या वडलांबद्दल अभिमान वाटावा अस ऎकायला मिळत नाही. अनेक कारण असतात त्यासाठी. कधी कधी वडिल खरच कोणतच चांगल काम करत नाहीत. कधीकधी घरातल वातावरण तस असत. आई वडलांची भांडण असतात व त्यामुळे आई सतत वडलांबद्दल वाईटच बोलत असते.

नुकताच मला एक अनुभव आला.

माझ्याबरोबर पूर्वी काम करणारा एक माणूस मला रस्त्यात भेटला. अतिशय हुशार असा हा माणूस, माझ्या आधीच्या कंपनीत प्युन म्हणून लागला होता. बघता बघता संगणकाच रिपेअरिंग, थोडफ़ार सॉफ़्टवेअर हा थोड्या अवधीत शिकला होता. अत्यंत प्रामाणिक असलेल्या या माणसात सर्व गुण ठासुन भरलेले होते. फ़क्त एकच दुर्गुण या गृहस्थात होता ज्यामुळे त्याचे सर्व गुण फ़ुकट गेले होते तो म्हणजे हा दारुडा होता. अनेकवेळा मी त्याला खुप झिंगुन लडबडत चालताना पाहिलेल आहे. आज तो शुद्धीवर दिसला, म्हणुन त्याची चौकशी करावी अस वाटल. मला त्यानी रस्त्यातच नमस्कार केला.

आपल्या ३-४ वर्षाच्या लहान मुलाला घेऊन तो चाललेला होता. बाप व मुलगा दोघेही अनवाणी व विटक्या कपड्यात होते. बापाचा चेहरा दारुमुळे सुजलेला होता. मुलाला बहुतेक २-४ दिवस आंघोळ घातलेली नसावी. कपडे फ़ाटके व मळलेले होते. केस कोरडे व रखरखीत दिसत होते. मी मुलाकडे बघितल, लक्षात येत होते ते त्याचे चकाकणारे काळॆभोर, पाणीदार व मोठे डोळॆ. ते डोळे भराभर आजुबाजुचा परिसर न्यहाळात होते व मिळेल ते शिकत होते. त्याच्या बापासारखाच हाही खुप हुशार असावा. चेहरा खुप तरतरीत व बोलका होता. मी माझ्या नकळत खाली वाकलो आणि त्याला उचलुन घेतल. आणि त्याचा बाप नको नको म्हणत असता जवळाच्या दुकानातुन एक बिस्किटाचा पुडा घेऊन त्या मुलाला दिला.

त्या मुलाला म्हणालो "तुझा बाप माझा खुप चांगला मित्र आहे, खुप हुशार व प्रामणिक आहे तो. त्याच्यासारखाच हो बर का ! " तो मुलगा इतका गोड हासला. आणि त्यानी अभिमानानी आपल्या बापाकडे पाहिल. काही न बोलता मित्र मुलाला माझ्या कडेवरुन घेऊन निघुन गेला. मला वाट्ल मी बोलताना काही चुक केली की काय.

काही दिवस मधे गेले आणि तो मित्र माझ्या घरी आला. आज त्याचा चेहरा कमी सुजलेला वाटला. मला म्हणाला "काका, त्या दिवशी तुम्ही मला रस्त्यात भेटलात व मुलाला म्हणालात की ’तुझा बाप खुप हुशार व प्रामाणिक आहे’ हे ऎकल्यावर मुलानी माझ्याकडे इतक्या अभिमानानी बघितल की मला ती नजर सहनच झाली नाही. घरी जाऊन त्यानी सर्वांना सांगितल की आजोबा म्हणत होते की बाबा खुप हुषार आहे. त्यानी पहिल्यांदाच आपल्या दारुड्या बापाबद्दल चांगल ऎकलेल असेल. त्याला मी कधी बिस्किट घेऊन दिलेल नव्हत. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच संपूर्ण बिस्किटाचा पुडा मिळाला. पण काका त्यानंतर दारु पिताना मला तीच नजर दिसते. पोटात ढवळुन येत आणि मी दारु न पीता सरळ घरी जातो. काल त्याला बिस्किटाचा पुडा घेऊन गेलो. त्यानी विचारल की ’आजोबांनी दिला का ?’ मी म्हणालो "नाही रे मीच तुझ्यासाठी आणला आहे, माझ्या बाळासाठी" मित्र म्हणाला "काका, मी हे बोलल्यावर त्यानी खुप आनंदानी माझ्या गळ्यात मिठी मारली. बस मी ठरवल आहे. आता दारु नाही प्यायची."

या माझ्या मित्राचा हा निश्चय किती दिवस टिकेल कल्पना नाही. पण त्या लहान मुलाला "माय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट" अस नक्कीच वाटल असेल.

आपण किती नशिबवान असतो आपल्याला जगातले सर्वात चांगले आई-बाबा मिळालेले असतात. फ़क्त ते किती चांगले होते हे ते गेल्यानंतरच आपल्याला समजत. मला माझ्या वडलांच्या आठवणी एकामागोमाग एक येत गेल्या.
मला माझ बालपण आठवायला लागल. माझ्या त्यावेळच्या जगात असलेल्या प्रत्येक संकटांमधुन मला बाहेर काढायची शक्ति असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडिल. मी त्यांना आण्णा म्हणायचो. त्यांच्या रुंद छातीचा मला खुप अभिमान होता. या छातीवर त्यांनी आभाळ पेललेल होत.

कधी ताप आला, काही लागल व नुसता त्यांच्या हाताचा स्पर्ष झाला तरी दुखण कमी व्हायच. ती एक त्यांच्या प्रेमाची जादू होती.

लहान असताना मला आजी शबरीची गोष्ट सांगत होत्या. खुप रंगवुन रंगवुन त्यांनी ती कथा सांगितली. शबरीनी बोरं कशी आणली व प्रत्येक बोर चाखुन कस पाहिल. आणि रामानी तीची भक्ति पाहुन ती बोरं कशी खाल्ली

आजी सांगत होती

"शबरीनी रामासाठी रानातुन बोरं आणली व ती गोड आहेत का हे बघायसाठी प्रत्येक बोर ती चाखत होती"

"पण आजी तीनी बोरं का आणली ? आंबा किंवा सफ़रचंद का नाही आणला ? देव तीच्या घरी येणार तर चांगल करायच न. आपण नाही का पूजा असली की किती चांगल करतो"

"अरे शबरी गरिब होती"

"गरिब म्हणजे काय ? "

"ज्यांच्याकडे कमी पैसे असतात त्यांना गरिब म्हणतात. ते लोक बाजारातुन फ़ळ आणू नाही शकत "

" आपण गरिब आहोत का ? "

" आपणही गरिबच. पण ती खुप गरिब होती "

" पण आजी आपण नाही का आंबे, द्राक्ष व सफ़रचंद आणतो. ते गोडच असतात. आणि रामानी ती उष्टी बोर कशासाठी खायची ? मला नाही ते आवडल. किती घाण होता तो."

माझ्या त्यावेळच्या जगात गरिबी व श्रिमंती या शब्दांना स्थानच नव्हत. आपण खुप आंबे, सफ़रचंद व द्राक्ष खातो. शबरी थो्डी कमी गरिब असेल पण तरी थोडी फ़ार अशी फ़ळ आणत असेलच न. मला काही केल्या आजीनी सांगितलेली गोष्ट पटतच नव्हती. आजीच लॉजीकच समजत नव्हत. उगाच आजीशी हुज्जत घालत होतो.

आण्णा ऎकत होते. रविवार सकाळाचा दिवस होता. ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. रान जवळच होत. त्यात मला नेल. एका आदिवासी माणसाच घर दाखवल. गरिबी काय असते हे मी पहिल्यांदाच पाहिल होत तेव्हा. मग त्याच आदिवास्याच्या मुलाबरोबर मला बोरं आणायला पाठवल. त्यावेळी पायात कोणाच्याच चपला नसायच्या. माझ्याही नव्हत्या. २-३ बोरं आणेपर्यंत पायात काटे रुतले. परत आलो. वडलांनी मला जवळ घेतल म्हणाले की

"शबरी किती गरिब असेल समजल का ?" मी होकारार्थी मान हलवली.

मग त्यांनी त्या वातावरणात शबरीची गोष्ट परत सांगितली म्हणाले

"त्या शबरीनी राम येणार म्हणून खुप बोर आणली. तीला किती बर काटे रुतले असतील ? जर रामानी बोरं उष्टी आहेत म्हणुन खाल्ली नसती तर त्या शबरीला किती बरं वाईट वाटल असत."

मला एकदम ही गोष्ट पटली. रामाबद्दल आदर वाढला.

वडिल खुप मेहनत करत. मुंबईला नोकरीला जायचे. ठाणा स्टेशनवरुन आमच घर ५-६ मैल लांब होत. तेव्हढ अंतर चालत जाऊन ऑफ़िसमधे मेहनतीच काम करण साध नव्हत. शिवाय घरी आले की शेतीच काम, गुरांच काम होतच. खुप पसारा त्यांनी वाढवला होता. कमी शिकले असले तरी जे शिकले ते ब्रिटिशांच्या वेळच्या इंग्रजी शाळेत शिकले होते. इंग्रजीवर प्रभुत्व होत. ते एक चालती बोलती डिक्शनरी होते.

मुलांना जास्तीत जास्त शिकवायच व हे शिकवत असताना त्यांच्यासाठी काही तरी स्थावर मिळकत उभी करायचीच या ध्येयानी ते पछाडलेले होते. स्वतः १६ व्या वर्षी गिरणीत नोकरीला लागले, ते एक हेल्पर म्हणून आणि काम शिकत शिकत ते कॉस्ट अकाऊंटंट झाले. त्यांनी अनेक हालअपेष्टा काढल्या होत्या, पण त्याची साधी झळसुद्धा आमच्या पर्यंत येऊ दिली नाही. हे करताना नेहेमी ते आनंदी असायचे. मी तुमच्यासाठी किती करतोय, त्याची जाणिव ठेवा वगैरे कधीच लेक्चर दिल नाही. आईची त्यांना साथ होतीच पण मुख्य जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती.

बहिणी मोठ्या होत्या, आम्ही मुलं लहान होतो. मुलींची लग्न, बाळंतपणं, आला गेला या सर्वांच त्यांनी केल. आणि त्यातच आमची शिक्षणं केली. प्रॉप्रर्टीच्या केसेस पूर्ण केल्या. आमच्यावर कोणतीच जबाबदारी ठेवली नाही. मोठी घरं मात्र ठेवली.
मला नोकरी लागली. पहिला पगार १ तारखेला यायचा होता. त्यावेळच्या मानानी पगार बरा होता. ३० तारखेला त्यांनी नेहेमीसारख बजेट केल व मला म्हणाले

"आयुष्यात पहिल्यांदा बजेट केल आणि पैसे शिल्लक राहिलेत"

हे बोलताना त्यांच्या चेहर्‍यावर इतक समाधान होतं.

मी विचारल की "येताना तुमच्यासाठी काय आणू ?"

ते म्हणाले "मला मिठाई व नानकटाई खावीशी वाटते. मी कधीच मजा म्हणून या गोष्टी खाल्या नाहीत"

आमच्यासाठी त्यांनी स्वतःचे किती हाल करुन घेतले असतील हे प्रथमच मला जाणवल. १६ व्या वर्षापासून नोकरीकरुन स्वतःच्या आई, बहिण व भावाला सांभाळताना. व नंतर संसाराचा गाडा ओढताना त्यांनी कितीतरी कॉंप्रमाईज केलेली असतील. या उतार वयात या कर्तबगार माणसाला या साध्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या.

मी पगार मिळताच येताना सर्वात पहिल्या या दोन गोष्टी विकत घेतल्या आणि घरी आलो. आण्णा झोपलेले होते. त्यांना खुप ताप होता.

मला म्हणाले की "मी ताप उतरला की मी मिठाई व नानकटाई खाणार आहे."

दोन दिवस ताप होता व तिसर्‍या दिवशी त्यांना हार्टअ‍ॅटॅक आला. अ‍ॅंब्युलन्स बोलावली व त्यांना हॉस्पिटलमधे नेल. त्यांच्या चपला न्यायच्या राहुन गेल्या.

ते म्हणाले "निरंजन माझ्या चपला इथे आण रे"

मी घरी आलो आणि त्यांच्या चपला उचलल्या. पार झिजुन त्याच्या टाचांना भोकं पडली होती. आमच्यासाठी त्यांनी न बोलता किती खस्ता खाल्या होत्या, किती मेहनत केली होती, हे त्या चपलाच मला सांगत होत्या.

मी नोकरीच्या इंटर्व्हुला जाणार म्हणून माझ्यासाठी त्यांनी जबरदस्तिनी आणायला लावलेले नवे कोरे बुट माझ्या आधीच्या चांगल्या स्थितीतल्या बुटांच्या बाजुलाच होते आणि माझ्या पायात नवी चप्पल होती.

आजवर मला हे मिळाल नाही, ते मिळाल नाही, म्हणून खट्टू होणार्‍या मलाच मी मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली.
आण्णांचा तोच एकमेव चपलांचा झिजलेला जोड माझ्या हातात होता. मी तसाच तो डोक्याला लावला मनोमन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या त्या त्यागापुढे नतमस्तक झालो होतो. माझ्या नकळत माझे डोळे भरुन आले आणि अश्रु त्या पवित्र चपलांवर पडले.

Thursday, May 28, 2015

Language of God


I know the Language of God
He tries to speak to me
He speaks thru the Eyes of a child
Who expects a smile from me

He speaks thru the eyes of oldies
Who hardly could look at me
He speaks thru their wrinkled faces
Who expects a word from me

He speaks thru the eyes of a bird
Who sings a song for me
He speaks thru the eyes of a beggar
Who expects a bread from me

I don’t have time to talk to him
My pride and ego hide me from him



Niranjan Pradhan

Monday, May 25, 2015

स्वामीजींची कृपा....


सतत अपमान सहन करण आणि तो सुद्धा खाली मान घालुन यासारख दूसर दुःख नाही. ज्या माणसाला कर्ज काढाव लागत तो त्या कर्जापेक्षा उपकाराच्या ओझ्याखाली सतत दबलेला असतो. मग तो माणूस त्याची बायको व मुलं सर्व या माणसाचे गुलाम होतात.

मुलांचे तर हाल खुप वाईट असतात. त्यांना बिचार्‍याना हेच समजत नसत की आपला सतत अपमान व राग का होतोय ? पण तो होत असतो. त्यांच्या बालमनावर त्यामुळे नेमका कॊणता परिणाम होईल हे सांगता येत नाही. काही मुलं गुन्हेगार होतात तर काही गोगलगाय होऊन आला दिवस ढकलत असतात. त्यांना स्वतःच मनच उरलेल नसत. सतत कोणाचे तरी पाय धरायचे. होईल तो अपमान सहन करायचा हेच त्यांनी आपल्या मनाला वारंवार बजावलेल असत. एकदा मन मेल की मग कोणीही त्या माणसाला काहीही बोलाव, कोणतही काम सांगाव, तो ते करत असतो. मुकाट्यानी. माझी अवस्था काहीशी अशीच झालेली होती. माझ्या स्वतःच्या मनाचा कोणी विचारच केलेला नव्हता. लहानपणापासून कधी मी कोणाला काहीच मागितलेल नव्हत.

कर्जाचा बोझा वाढत गेला आणि एक दिवस बाबा रक्ताची उलटी होऊन खाली पडले. धावाधाव झाली. पण पडलेले बाबा उठलेच नाहीत. आमच्यावर येणार्‍या संकटांमधे एका फ़ार मोठ्या संकटाची भर पडली. खचलेल आमच कुटुंब पार खचुन गेल. कर्जदार समजुन चुकले की आपल कर्ज बुडाल. मी व माझ्यापेक्षा लहान सगुणा दोघांना पोटाशी घेऊन आई बसली होती. समोर बाबांच प्रेत पडलेल होत आणि आई लोकांचे पाय धरत होती. कळवळुन सांगत होती की मी व माझी मुलं पै न पै फ़ेडु तरी त्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. बाबांच्या प्रेताकडे बघुन लोकं शिव्या देत होते आणि आम्ही डोळ्यात अश्रु आणुन ते ऎकत होतो.

बाबा गेल्यानंतर एक दिवस आईला एका नातलगाच पत्र आल. त्यांच नाव आबासाहेब नामजोशी. पत्रात त्यांनी लिहिल होत की "तुझ्या दोन मुलांपैकी एकाची जबाबदारी मी घेईन. त्याला माझ्याकडे पाठव. यापेक्षाजास्त मी काही करु शकत नाही" आईला काय कराव समजत नव्हत. आबासाहेबांबद्दल ते खुप श्रिमंत आहेत, यापलिकडे तीला काही माहिती नव्हती. नामजोशांनी वडलांना कधी तरी कर्ज दिल होत. कर्जदारानी लिहाव अस ते पत्रच नव्हत. त्या पत्रात त्या कर्जाचा नामोल्लेखही नव्हता. आईला काय कराव हे समजत नव्हत. एका मुलाला कोणाकडेतरी पाठवायच हा निर्णय सोपा नव्हता.

ती आम्हाला दोघांना घेऊन जवळच्या गावाला गेली. त्या गावात आईचे गुरु होते, अंतरनाथ. स्वामी अंतरनाथांचाच आईला एकमेव आधार होता. स्वामी अंतरनाथांकडे पाहिल्यावर खुप बर वाटल. त्यांना आम्ही तिघांनी नमस्कार केला. त्यांनी आम्हा दोन्ही मुलांना जवळ घेतल. तोंडावरुन हात फ़िरवला. आई-बाबांशिवाय मला कोणी प्रेमानी जवळ घेतल नव्हत. बाबांची खुप आठवण आली. गळा अचानक दाटुन आला. डोळ्यातुन पाणी आल. स्वामी म्हणाले "रडु नकोस. आता तुझ्या घराला तुच परत वर आणणार आहेस." आईनी आबाकाकांच पत्र त्यांना दाखवल. पत्र हातात पडताच स्वामी एकदम गंभीर झाले. त्यांनी डोळे बंद केले आणि थोडावेळ शांत बसले. डोळे उघडुन माझ्याकडे त्यांनी पाहिल. माझ्या सर्वांगातुन एक सुखद लहर गेली. आपल्यात कसलातरी संचार होतोय अस वाटायला लागल. खुप खुप बर वाटल. त्यांचे डोळे प्रेमळ व शांत होते.

स्वामी आईला म्हणाले. "दुर्गा तुला वाटतय तेव्हढ हे पत्र साध नाही. तू हे पत्र इथे आणलयच हे खुप चांगल झाल. आता या प्रकरणाचा आपल्याला शेवट करता येईल. तुझ्या या मोठ्या मुलाला हे सहज जमेल."

आई स्वामींच्या पाया पडली म्हणाली "स्वामी तुमचाच मला आधार आहे. तुमच्या मी शब्दा बाहेर नाही"

स्वामी म्हणाले "दुर्गे, मी कोणतीच जबरदस्ती करणार नाही. जरी हा तुझा मुलगा असला, तरी हा महत्वाचा निर्णय त्यानीच घ्यायचा आहे. तो लहान आहे पण विचारी दिसतोय"

माझ्याकडे पाहुन म्हणाले "नाव काय तुझ?"

"सोमेश, सगळे मला सोम्या म्हणतात"

"पण मी तुला सोमेशच म्हणेन. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी ते सांगेन ते करशील ?"

मला का कोणाला माहिती पण स्वामींच्यावर खुप विश्वास वाटला. कदाचित आजतागायत माझ्याशी कोणीच नीट बोललेल नसेल, त्यामुळे वाटल असेल.

मी म्हणालो "माझा विश्वास आहे"

"हे बघ, तुला जे बोलावतायत ते कशाला बोलावतायत याची मला अद्याप नीटशी कल्पना आलेली नाही. पण ते तुला काही खुप चांगल्या कामासाठी व तुझ भल करायसाठी बोलावतयत अस वाटत नाही."

आईच्या तोंडुन लहानसा चित्कार आला. तोंडाला पदर लावुन ती रडायला लागली. आता हे एक नवच संकट तीला समोर दिसत होत. आई म्हणाली "स्वामी, अस असेल तर नाही याला मी पाठवणार"

"दुर्गे हे इतक सोप नाही. ते मुलाला ओढुन नेतील. पण तुम्ही घाबरु नका. मी आहे तुमच्या बरोबर. बघ सोमेश, मी सतत तुझ्या बरोबर असेनच. कदाचित एखाद वाईट काम तुझ्या हातुन करुन घेण्यासाठी ते तुला बोलावत असतील. बिलकुल घाबरायच कारण नाही. तरी सुद्धा अशा ठिकाणी जायच की नाही हे तू ठरवायच आहेस. "

स्वामींनी डोळे मिटले. आईचा चेहरा पांढरा फ़टक पडलेला होता. तीचा कृष चेहरा बघवत नव्हता. तीच्या मांडीवर बसलेली बारीक हातापायाची व मोठ्या पोटाची सगुणा दोघी माझ्याकडे बघत होत्या. या दोघींवर माझा बोझा मला टाकायचा नव्हता. स्वामींवर माझा विश्वास बसलेला होता. मनोमन खत्री पटत होती की स्वामी मला कोणत्याही संकटातुन तारुन नेतील.

मी स्वामींकडे पाहिल. एका दैवी तेजानी त्यांचा चेहरा उजळलेला होता. मी म्हणालो "स्वामी मी तयार आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे"

स्वामींनी डोळे उघडले. आणि माझ्याकडे बघितल. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवताच मी कोणत्यातरी प्रकाशाकडे खेचला जातोय अस वाटत होत. आत आत ओढला जात होतो. हे आत ओढल जाण हव हवस वाटत होत. स्वामींच्या डोळ्यात लागलेली माझी नजर दूर होत नव्हती व ती मला बाजुला करावीशी वाटत नव्हती. माझा श्वास खुप संथ झालेला जाणवत होता. माझा श्वास चालु होता की बंद होता हे मलाच समजत नव्हत. श्वासावरच लक्ष दूर झाल. माझ्या शरिराच अस्तित्व मला जाणवत नव्हत. जणू माझ शरिर गळुन पडल होत. हळुच मनात ॐ काराचा उच्चार झाला. हा अनुभव काही वेगळाच होता.

त्याच वेळी स्वामींचे शब्द कानावर आले. हे शब्द त्यांनी उच्चारले होते का, ते माझ्या कानानी ऎकले की मनातच त्याचे तरंग उठले हे सांगण खुप कठिण आहे. स्वामी म्हणाले "आता मी तुला मंत्र सांगतोय तो मंत्र लक्षात ठेव" त्यांनी मंत्र सांगितला. सोपा साधा मंत्र. माझ्याकडुन तो तीन वेळा म्हणून घेतला. मला डोळे बंद करुन त्याचा जप करायला सांगितला. हळू हळू मला शरिराच अस्तित्व जाणवायला लागल. जणू मी परत माझ्या शरिरात येत होतो.

स्वामींनी आईकडे पाहिल म्हणाले "आत जा. साखर आहे व दूध आहे. त्याचा नैवेद्य दाखव. आपण सगळेच दूध घेऊ"

आई व सगुणा आत गेले. स्वामी माझ्याशी हलक्या आवाजात बोलायला लागले. "आत्ता तुला दिलेला मंत्र दूसर्‍या कोणालाही सांगायचा नाही आणि सतत मनात तोच म्हणत राहायचा. तो मंत्र तू म्हणतोयस तो पर्यंत जगातली कोणतीच शक्ती तुला त्रास देऊ शकणार नाही. घाबरायच नाहीस. कोणतही संकट आल तरी मी तुझ्याबरोबर आहेच."

मी मान डोलावली. माझ शरीर अद्याप एका अनामिक आनंदानी थरथरत होत. मी स्वामींना विचारल मला आलेला हा अनुभव काय होता ? स्वामी फ़क्त हसले. म्हणाले "हा अनुभव कोणालाच सांगु नकोस. तसच यापुढे तुला येणारे कोणतेच अनुभव दूसर्‍याला सांगु नकोस. कारण हे अनुभव फ़क्त तुलाच येतील. दूसर्‍याला ते खरे वाटणार नाहीत. आणि जर तू दूसर्‍याला सांगितलेस तर ते अनुभव परत येणार नाहीत." मी मान डोलावली.

आई दूध घेऊन आली. स्वामीनी त्यांच्या देवापुढे ते ठेवायला सांगितल. त्या दूधाचा नैवेद्य दाखवला. आईला व सगुणाला दूध प्यायला दिल. सगुणाला तीच्या आठवणीत इतक दूध पहिल्यांदाच मिळाल. स्वामींनी मला जवळ बोलावल. स्वतःच्या हातानी त्यांनी मला दूध पाजल. इतक कोणीच माझ्यावर प्रेम केलेल नव्हत. मला रडु येत होत. आमच दूध पिऊन झाल्यावर स्वामींनी त्यांचा कप तोंडाला लावला व दूध प्यायले.

आईला म्हणाले "दूर्गा, डाळ, तांदूळ, भाजी सर्व आत आहेच. स्वैपाक कर आणि तुम्ही सर्व जेऊन घ्या. मी माझ्या खोलीत जातोय. संध्याकाळी मी बाहेर येईन तेव्हा तुमच्याशी पुढे काय करायच हे बोलु. तुम्ही जेऊन आराम करा. रात्रीचा स्वैपाक कर. आज इथेच रहा. घरा बाहेर जाऊ नका. मी रात्री फ़क्त दूध पिणार आहे. माझा स्वैपक करु नकोस"
अस म्हणून स्वामी त्यांच्या खोलीत आत गेले.

मला व सगुणाला उकिडव बसायची सवय लागलेली होती. कोणता तरी कोपरा वा भिंतीला चिकटुन आम्ही बसत होतो. तासन तास बसायची सवय लागलेली होती. तसेच आम्ही बसलो होतो. दिवस तसा वेगळाच गेला. मी एका आनंदात तरंगत होतो. कमीच बोलायची सवय होती मला. आता दिलेला जप करायची मनाला सवय लागली. मधेच जप थांबायचा. परत सुरु व्हायचा. सगुणा व आई मधुन मधुन बोलत होत्या. अनेक दिवसांनी पोटभर खायला मिळालेल होत. डुलक्या येत होत्या. आई व सगुणा फ़रशीवरच आडव्या झाल्या आणि झोपुन गेल्या. मी तसाच बसलो होतो. अचानक वातावरणातला बदल जाणवायला लागला. खुप चांगला सुगंध यायला लागला. जो बदल होतोय तो चांगला होता हे नक्की. अचानक माझ्या कानात स्वामी बोलल्यासारखे वाटले "सोमेश, उठ आत खोलीत ये" मला कळॆ ना स्वामी खरच बोलावतायत, का हा मनाला झालेला भास आहे ? परत स्वामींचे तेच मृदु शब्द आले. "सोमेश, उठ आत खोलीत ये" मी उठलो आणि खोलीच दार अलगद उघडुन आत गेलो. स्वामींचा परत आवाज आला "दार आतुन बंद कर. आणि तसाच पुढे ये" मी दाराला आतुन कडी लावली व आत गेलो. एका आसनावर स्वामी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या आजु बाजुला निळा प्रकाश दिसत होता. मी त्यांच्या समोर गेलो. त्यांनी दूसर्‍या आसनाकडे बोट केल म्हणाले "बस"

मी त्या आसनावर बसलो. बसुन काय करायच हे कुठे माहिती होत ? मी मनात तोच जप करत बसलो होतो. अचानक स्वामींच्या नीळ्या प्रकाशातला काही प्रकाश माझ्या तोंडावर पडला. मी त्या प्रकाशात ओढला जायला लागलो. त्यानंतर काहीच आठवत नाही. स्वामींनी मला आठ दिवस ठेऊन घेतल. रोज असाच अनुभव यायचा. आता माझ व स्वामींच मनानीच बोलण होऊ शकत होत. मी कुठेही असलो तरी स्वामी बरोबर आहेत हे जाणवत होत. ते बरोबर असायचे की माझ्या शरिरात असायचे हे सांगण कठिण आहे.

आई मला म्हणाली "पडेल ते काम कर बाळा. आपल्यावर वेळच तशी आलेली आहे. स्वामीच आपल्याला वाचवतील" मला जवळ घेतल.

मी जेव्हा नामजोश्यांकडे गेलो तेव्हा १४ वर्षाचा होतो. दारातच आबाकाका उभे होते. एक बुटके व जाडगेले गृहस्थ. त्यांच्याकडे पाहिल तरी भिती वाटायची. मी माझ नाव सांगितल. आबाकाका नुसतेच माझ्याकडे बघत होते. त्यांना ऎकायला आल आहे का नाही समजत नव्हत. त्यांच्या नजरेत एक धार होती. मला म्हणाले "कोण आहे तुझ्या बरोबर ?" आवाज चिरत जाणारा होता. असच मागे पळुन जावस वाटत होत. मी काहीच उत्तर दिल नाही. ते जळजळीत नजरेनी एकटक बघत राहिले. मी नजर खाली ठेवली होती. तरी त्यांची नजर माझ्या सर्वांगावरुन फ़िरते याची जाणिव होत होती.

तेच म्हणाले "कोणी का असेना बरोबर, ये आत" मी आत गेलो. त्यांनी माझी शांताकाकुंशी ओळख करुन दिली. शांताकाकुंची नजर मेलेलीच वाटत होती. त्यात कोणतेच भाव नव्हते. त्यांनी माझ्याकडे बघितल. मला म्हणाल्या "कशाला आलास इथे?"

आबाकाकाच मोठ्यानी ओरडले "हे काय बोलण झाल ? त्याचे वडील गेले. घरी कोण सांभाळाणार ? मीच बोलावुन घेतल. माझ्या कामात तो मदत करेल. तुम्ही आत जा" शांताकाकु आत गेल्या.

काम अस काहीच नव्हत. दिवसा नोकर काम करायचे व जायचे. सर्वांच्या कामावर आबाकाकांच बारीक लक्ष असायच. या घरात एकच होत कोणीच बोलायच नाही. एकदाच मला एका मोलकरणीनी नाव विचारल. आणि म्हणाली जमल तर इथुन पळुन जा. अर्थात मला घरा बाहेर जायची परवानगी नव्हतीच. एकदाच मी आकाशात आलेल हेलिकॉप्टर बघायला बाहेर गेलो. आबाकाकांना ते कस समजल माहिती नाही. ते लगेच बाहेर आले व मला आत यायला लावल.

आबाकाका हाक मारत ती इतक ओरडुन की मी दर वेळेस दचकायचो. छातीत धडधड व्हायची. मी मनातच सतत देवाच नाव घ्यायचो. चाळाच लागला होता तो. त्यांच्या खोलीत कोणालाच प्रवेश नव्हता. त्यांची कामही करताना उगाचच भिती वाटायची. काम तरी काय तर शांताकाकु एका ताटात भाताच्या तीन चार मुदी वाढायची. एकावर दही, एकावर वरण तर एकावर आणखिन काही काही. मग हे ताट घेऊन आबाकाकांच्या खोलीबाहेर जायच. काकांना लगेच समजायच मी आलोय. ते ताट घ्यायचे व आत जायचे. खुप वेळानी मला हाक मारायचे. आणि ताट द्यायचे. त्या भातावर बरच काही टाकलेल असायच. त्या ताटाकडे बघण कठिण जायच. इतक भयानक दिसायच ते. मग ते स्वतः माझ्याबरोबर यायचे. आणि खुप लांब आम्ही ते स्मशानात ठेवायचो. पहिल्यांदा खुप भिती वाटली. मनात स्वामींना हाक मारली आणि स्वामी माझ्या बाजुलाच मला दिसले. मला म्हणाले घाबरु नकोस. तो म्हणतोय ते कर. अद्याप वेळ आलेली नाही.

असा मी आबाकाकांबरोबर बर्‍याचवेळा स्मशानात गेलो.

एकदा त्यांनी स्मशानात रात्री नेल. खुप भिती वाटत होती. मिट्ट काळोख होता. मी, आबाकाका , वाहणारा गार वारा व त्यावर झुलणार प्रचंड पिंपळाच झाड. या पलिकडे कोणतच जिवंतपणाच लक्षण दिसत नव्हत. आबाकाकांनी त्यांच्या सामानातुन एक बाटली बाहेर काढली. काही बाहुल्या काढल्या एका ठिकाणी विचित्र रांगोळी काढली. त्या बाटलीत रक्त होत ते त्यांनी जमिनीवर ओतल एक मोठ वर्तुळ तयार केल. नंतर काही अंतरावर झाडाच्या मागे एक राखेच वर्तुळ तयार केल. मला जमिन खणायची हत्यारं दिली व म्हणाले की मी रक्ताच वर्तुळ तयार केलेल आहे, त्याच्या मध्यभागी थोड खण व इथे या राखेच्या वर्तुळात येऊन उभा रहा. तू या वर्तुळात असलास की तुला काही त्रास होणार नाही. नंतर मी जे करीन ते पाहु नकोस पाठ करुन उभा रहा. थोड खणल्यावर मला म्हणाले थांब. मग मला लांब राखेच्या वर्तुळात उभ राहायला सांगितल व स्वतः सावकाश खणायला लागले. मी बघायच नव्हत पण उत्सुकता होतीच मी चोरुन बघत होतोच. स्वामीजींचा आवाज आला "सोमेश, हा प्रकार पाहुन घाबरु नकोस"

आबाकाका आतुन काही काढत होते. मी बघितल ते एका लहान मुलाच प्रेत होत. आबाकाकांनी त्या लहान मुलाच्या कपाळावर, डोळ्यांवर तोंडावर व छातीवर भाताचे गोळे ठेवले. एक मेणबत्ती काढुन त्याच्या समोर लावली, चार बाहुल्या त्याच्या चारही बाजुंना ठेवल्या व काही मंत्र पुटपुटत होते. ते लहान मुल थोड हलल. आबाकाकांनी त्याला उचलल आणि त्याच्या शरिराचे मिळेत त्या ठिकाणी लचके तोडुन खायला लागले. ते मुल जिवंत मुलासारख कळावळुन रडायला लागल. मला हे दृष्य बघवेना. मी दोन्ही हातानी माझ तोंड झाकुन घेतल. थोड्या वेळानी पाहिल तर आबाकाका तो खड्डा बुजवत होते. काम झाल्यावर ते मागे फ़िरले. मी काहीच पाहिल नाही अस दाखवल. त्यांनी मला परत घरी आणल. या दिवसापासून मला आबाकाकांची एक वेगळीच भिती वाटायला लागली.

एकदिवस मला शांताकाकुंनी जवळ घेतल. पण काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात मला प्रेम दिसल. पण थोडाच वेळ, परत ती नजर दगडी झाली. त्यादिवशी पहिल्यांदाच मला आबाकाकांनी त्यांच्या खोलीत बोलावल. मी घाबरतच आत गेलो. आतला प्रकार भयानक होता. एका रेषेत सहा लहान मुलांच्या कवट्या ठेवलेल्या होत्या. त्यापुढे लाल रंगाची रांगोळी काढलेली होती. प्रत्येक कवटीच्या पुढे एक काळी बाहुली ठेवलेली होती. या सर्वाकडे तोंड करुन आबाकाका उघडे बसलेले होते. त्यांच्या कपाळाला रक्ताचा टिळा होता. खोलीत एक दुर्गंधी सुटली होती. कसली ते समजत नव्हत. मला आबाकाकांनी समोर बसायला सांगितल. मला म्हणाले आज आमावास्या आहे. आपल्याला रात्री स्मशानात जायच आहे. मी काही पूजा करीन. आणि भूताला प्रसन्न करीन. त्यानंतर तू तीन वेळा "मम स्वाहाः" अस म्हणायचस. मी मान डोलावली. माझ्याकडुन "मम स्वाहाः" अस आबाकाकांनी वदवुन घेतल. माझे उच्चार नीट आहेत हे पाहुन ते खुष झाले. मला म्हणाले "आता तू जाऊन झोप. मी तुला रात्री उठवीन" मी विचारल "मम स्वाहाः म्हणजे काय ?" आबाकाका मोठ्यानी ओरडले. "तुला काय करायच आहे. मी सांगतो ते कर"

मी येऊन माझ्या खोलीत झोपलो. झोप येतच नव्हती. एक डुलकी लागली. स्वप्नात स्वामीजी आले. म्हणाले "सोमेश, आता वेळ आलेली आहे. आजच आपल्याला काही करायच आहे. स्मशानात मी तुझ्याबरोबर आहेच. आबा सांगेल ते कर. मी तुला वेळोवेळी काही सुचना देईन त्या पाळ बस. घाबरु नकोस. मनात सतत जप कर. त्यामुळे आपण एकमेकांशी सतत संपर्कात राहु. आता थोड्यावेळानी आबा येऊन तुला उठवेल. झोपेच सोंग कर. जाग व्हायला वेळ लाव. अर्थात आबा तस सोडणार नाहीच."

थोड्यावेळात खोलीच दार उघडुन आबाकाका आलेच. त्यांनी हाक मारली. मी जागाच होतो. पण झोपेच सोंग करुन डोक्यावरुन पांघरुण घेऊन पडलो होतो. हळुच पांघरुण बाजुला करुन बघत होतो. आबाकाकांनी परत जोरानी हाक मारली. जवळच्या पिशवीतुन थोडे तांदुळ काढले व माझ्या अंगावर फ़ेकेले. अंगावर गरम पाणी फ़ेकल्यासारख झाल आणि मी धडपडात उठलो. "सोम्या चल" मी झोपेतुन जाग झाल्याच नाटाक केल आणि त्यांच्या मागोमाग निघालो. शांताकाकुंनी भात, भाजा तीळ वगैरे असलेली पिशवी माझ्याजवळ दिली त्या खुप रडलेल्या वाटत होत्या. माझ्या डोक्यावरुन त्यांनी प्रेमानी हात फ़िरवला. त्यांच्या डोळ्यात मला फ़क्त व फ़क्त दुःख दिसल. दोन क्षणच. लगेच त्यांची नजर पूर्ववत झाली. त्या मागे फ़िरुन निघुन गेल्या. मी त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होतो. या काही तासात त्या खुप म्हातार्‍या झाल्यात अस वाटत होत.

आबाकाका पुढे व मी मागे असे आम्ही स्मशानाकडे निघालो. आमावास्येचा काळॊख होता. आबाकाकांच्या सवयीची वाट होती ते झपाझप चाललेले होते. मी त्यांच्या मागोमाग. वार्‍याबरोबर एक उद्र वास येत होता. राख उडालेली दिसत होती. जस स्मशान जवळ येत होत तसा हा वास जास्तच वाढला. स्मशानाच दृष्य भयानक होत. तीन चिता अर्धवट जळलेल्या होत्या. एका चितेमधे अर्थवट बाईचा जळलेला देह दिसत होता. कोणातरी अनाथ बाईच्या देहाला भडाग्नी दिलेला होता व प्रेत संपूर्ण जळॆपर्यंतसुद्धा कोणी थांबलेल नव्हत. आबा त्या चितेपुढे दोन मिनीट उभे राहिले, त्यांनी डोळे मिटले. दोनच मिनीटांनी ते उघडले आणि मोठ्यानी हासले. त्या चितेच्या प्रकाशात त्यांचा चेहरा खुप क्रुर व भेसुर वाटला आणि त्या हासण्यानी अंगावर सरसरुन काटा आला.

आबाकाकांनी मला स्मशानातल्या नळावरुन पाणी आणायला सांगितल. ते पाणी त्यांनी चितेवर फ़ेकुन चिता विझवली. ते अर्धवट जळलेल प्रेत त्यांनी तंगड पकडुन फ़राफ़रा खेचुन बाहेर काढल. त्याच चितेच्या राखेच एक वर्तुळ त्या प्रेताभोवती केल. बाकी दोन चिता अर्धवट जळलेल्या होत्या. त्याही पाणी टाकुन विझवल्या आणि त्यातली राख काढुन या अर्धवट जळलेल्या प्रेताच्या बाजुला टाकुन, स्वतःच्या हातानी त्या राखेच्या चितारुन दोन माणसांच्या आकृत्या बनवल्या. त्यानंतर त्यांनी रक्ताची बाटली काढुन रक्ताच मोठ वर्तुळ केल. या रक्ताच्या वर्तुळावर त्यांचा फ़ार विश्वास होता. ते म्हणत या रक्ताच्या वर्तुळाला छेदुन कोणतीच शक्ति आत नाही येणार.

थोड्या अंतरावर त्यांनी राखेच वर्तुळ केल आणि त्यात मला बसायला सांगितल. मी आत बसलो. त्यांनी चार लहान मुलांच्या कवट्या बाहेर काढल्या आणि या वर्तुळा बाहेर चार दिशांना ठेवल्या. स्वतः जाऊन रक्ताच्या वर्तुळात बसले आणि त्यांची विचित्र पुजा सुरु झाली. सर्व प्रथम माझ्या जवळच्या कवट्या हलायला लागल्या. मी घाबरलो. मनातुन आपोआप जप होत होता. स्वामींचा आवाज आला. "घाबरु नकोस, मी आहे. तू आता झोपेच सोंग घे. तू ’मम स्वाहा’ हे म्हणायच नाहीस. आबा तुला जाग करेल तेव्हा तू ’काय म्हणायच आहे हे विसरुन गेलो’ अस सांग."

स्वामीची धुसर आकृती माझ्या बाजुला मला दिसली, केव्हढा दिलासा मिळाला मला. आबाकाकांची पूजा सुरु होती. थोड्याच वेळात ते अर्धवट जळलेल प्रेत उठुन उभ राहिल. अर्धवट जळलेली ती बाई नाचायला लागली आणि तीच्याबरोबर आणखिन दोन आकृत्या नाचायला लागल्या. त्यांच्या भेसुर आरोळ्यांनी स्मशान दणाणुन गेल. मी झोपेच सोंग घेतल पण डोळ्याच्या कोपर्‍यातुन बघत होतो. आबांनी पूजा पुर्ण करुन हातातले तीळ त्या प्रेतावर व आकृत्यांवर फ़ेकले त्याबरोबर ते नाचायचे थांबले.

आबाकाका म्हणाले "सोमेश बोल ’मम स्वाहा’". त्यांचा स्वर खुप उतावळा होता. बस मी हे तीन वेळा म्हणल्यावर त्यांना जगाच राज्य मिळणार होत जस काही. मी झोपेच सोंग घेतल. आबांनी परत मोठ्यानी ओरडुन हाक मारली "सोम्या, ’मम स्वाहा म्हण’" आणि हातातले तांदुळ माझ्या दिशेनी फ़ेकले. चाबुक मारल्यासारख झाल. मी खाडकन उभा राहिलो. पण स्वामींचे शब्द आठवले आणि मी म्हणालो "आबाकाका काय म्हणायच मी विसरलो. झोप लागली होती" आबा काका खुप चिडले "गाढवा, ’मम स्वाहा’ म्हण"

आबाकाकांनी स्वतःच उतावीळपणे चुकीनी तीन वेळा "मम स्वाहाः" म्हणल होत. ते अर्धवट जळलेल प्रेत व त्याच्या बरोबर त्या दोन आकृत्या आबाकाकांकडे सरकायला लागल्या. आबाकाकांना आपली चुक समजली. मला म्हणाले "मला हे तीघ काहीच करु शकणार नाहित. रक्ताची रेषा त्यांना ओलांडता येणार नाही. त्यांना संपवतो मग तुला बघतोच"

त्यांनी तांदुळ हातात घेतले मंतरले व त्या प्रेतावर फ़ेकले. काहीच परिणाम झाला नाही. ते तिघ संथ गतीनी पुढे येतच राहिले. आबाकाकांनी एक कवटी घेतली तीला जमिनीवर ठेवल व मंत्र म्हणला. कवटी हलायला लागली त्या कवटिला त्या प्रेतावर फ़ेकल. ती कवटी प्रेत व आबाकाका यांच्यामधे तरंगत राहिली. त्या प्रेतानी फ़क्त एक हात जोरात फ़िरवला आणि त्या कवटीला पार लांब फ़ेकुन दिल. आता ते तिघही रक्ताच्या वर्तुळापर्यंत आले होते. तीघेही तीथे येउन थांबले. आबाकाका भेसुर हासले. पण ते हास्य फ़ारच थोड्यावेळ टिकल. ते प्रेत व त्यापाठोपाठ दोन आकृत्या रक्ताच वर्तुळ ओलांडुन आबाकाकांवर झेपावले.

आबाकाकांची भयंकर किंकाळी आसमंतात घुमली. प्रेतानी आबाकाकांचा एक हात उपटुन काढला आणि रक्त प्यायला सुरवात केली. त्या आकृत्यांनी मिळेत त्या ठिकाणी लचके तोडुन खायला सुरवात केली. आबाकाका ओरडत होते. पण त्या तिघांना बिलकुल दया नव्हती. नंतर त्यांनी आबाकाकांना चक्क पिळायला सुरवात केली व पडणार रक्त भराभर पिऊन टाकल. माझी काय स्थिती होणार होती ते मला दिसत होत. शेवटी ते तिघेही आपापल्या चितेमधे निघुन गेले. स्वामीजी माझ्याजवळ प्रकट झाले. मला जवळ घेतल म्हणाले मोठ काम झाल. त्यांनी मंत्र म्हणून माझ्या वर्तुळाच्या जवळाच्या चारही कवट्या निकामी केल्या. म्हणाले आता लवकर घरी चल.

आम्ही धावतच घरी आलो. दारात शांताकाकु आडावी तिडवी पडलेली होती आणि तीच्या छाताडावर बसुन एक आकृती तीचा गळा आवळत होती. स्वामीजी पुढे धावले व मंत्र म्हणून त्या आक्रुतीच्या दिशेनी त्यांनी दोन्ही हात केले त्याबरोबर ती आकृती हवेतच जळुन गेली. शांताकाकु धडपडत उठली. मला बघताच तीला खुप आनंद झाला. मला मिठी मारुन म्हणाली "कसा रे आलास तू". स्वामी म्हणाले आबाच्या खोलीच चल. खुप काम आहे. आम्ही खोलीत गेलो. खोलीत अनेक कवट्या जिवंत झालेल्या होत्या. काही प्रेतात्मे व आकृत्या दिसत होत्या. स्वामीजी डोळे मिटुन उघे राहिले. त्यांनी गंभीर आवाजात काही मंत्र म्हणायला सुरवात केली. हळू हळू एक एक कवटी, आकृती व प्रेतात्मे शांत होत गेले.

रात्रीच त्या सर्व सामानाला आम्ही स्मशानात नेल व अग्नी दिला. आल्यावर स्वामीजींनी शांताकाकुंना बोलतं केल. त्या कोण कुठल्या ?

शांताकाकूंनी सांगितल "मी अनाथ बाई. या माणासानी माझ्याशी लग्न केल व मला इथे आणल. मला बाहेर जायची व बोलायची परवानगी नव्हती. मी फ़क्त यांच्या सांगण्याप्रमाणे वागायच इतकच. अनेक मुलांना यांनी आणल व स्मशानात नेऊन मारलय. हा एकच मुलगा परत आलाय."

स्वामी म्हणाले "मांत्रिकांमधे अनेक पंथ आहेत. आबासाहेब ज्या पंथाचे मांत्रिक होते तो एक फ़ार जुना पंथ आहे. त्यात मुलांचा बळी दिला की त्या मुलांच आयुष्य व नवीन चेतना व ताकत मांत्रिकाला मिळते असा समज आहे. आबासाहेब याच कारणासाठी हा विधी करत असावेत. त्यासाठी ते लहान मुलांना शोधुन इथे आणत असावेत. असो. आता हे घर संपूर्णपणे शुद्ध झालेल आहे. यात रहायला काहीच हरकत नाही. तरी शांताबाई तुम्ही निर्णय घ्या"

शांताकाकु म्हणाल्या "हा मुलगा माझ्या जवळ रहाणार असेल तर मी इथे राहिन"
स्वामींनी मला त्या घरात रहायला सांगितल.

आबाकाकांची संपूर्ण प्रॉपर्टी कायद्यानी शांताकाकुंकडे आली. त्यांनी मला दत्तक घेतल व आता आबाकाकांच्या घरात मी, शांताकाकु, आई व सगुणा राहतो. गावात मी एक किराणामालाच दुकान सुरु केलय. मस्त चालत. बाबांनी घेतलेल कर्ज मी केव्हाच सव्याज फ़ेडल.

स्वामीजींची कृपा आहेच. साधना सुरुच आहे.

.... निरंजन

Saturday, May 23, 2015

========= केतकी ==========






सकाळी रस्त्यात माझा एक हिजडा मित्र भेटला. त्याच्याशी बोलताना समजल केतकी वारली. मला वाईट वाटल. पण माझ्या मित्राला ते नाही आवडल. म्हणाला "नाराज क्यो हो रहा है ? छुट गयी इस भयानक लाई्फसे. आनंद होना चाहिये" कस तरी वाटल एेकुन ते.



मी केतकीवर पुर्वी लिहिलेला माझा अनुभव शेअर करतोय.



काही वर्षांपूर्वी मी मुंबईला स्कुटरनी जात होतो. स्कुटर सिग्नलपाशी थांबवली व मी सिग्नल मिळायची वाट बघत होतो. बाजुला गटाराच्या जवळ दोन हिजडे भिक मागुन मिळालेल खात होते. मला हिजड्यांचा प्रचंड राग होता व किळस वाटायची. मी त्या दोघांकडे तुच्छतेनी पाहिल आणि पचकन थुकलो. हिजडे एकमेकांशी बोलताना अत्यंत घाण शिव्या देत, गलिच्छ अंगविक्षेप करत बोलतात. शाप देतात. हेच मला माहिती होत. मी पाहिलेले हिजडे असेच होते.



या हिजड्यांच बोलण मला ऎकायला येत होत. ते हिंदी बोलताना मधेच उत्तम इंग्रजी बोलत होते. निदान माझ्यापेक्षा तरी त्यांच इंग्रजी चांगलच होत. माझ कुतुहल जाग झालं. मी स्कुटर बाजुला घेतली व थांबलो. त्यांच बोलण लक्ष देऊन एेकायला लागलो. ते दोघ मृत्युबद्दल बोलत होते.



त्यातल्या एकानी The Death या कवितेतल एक कडव म्हणल.



"Those that I fight, I do not hate...
Those that I guard I do not love..
A lonely impulse of delight
Drove to this tumult in the clouds"



थोड्यावेळापुर्वी मी याच हिजड्याकडे बघुन थुकलो होतो. माझीच मला लाज वाटली.



मी त्याची चौकशी केली. आयुष्यात प्रथमच मी एका हिजड्याशी स्वतःहुन बोलत होतो. रस्त्यातले लोकं माझ्याकडे विचित्र नजरेनी बघत होतो. पण आता मला त्याची पर्वा नव्हती.



मी त्याला नांव विचारल त्यानी "केतकी" अस सांगितल. मी दचकलोच. चेहर्‍यावर दाढीचे खुंट असलेली केतकी ? माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन त्यानी सांगितल.



"माझ मन आहे ते देवानी स्त्रीचच केलेल आहे, आणि शरिर पुरुषाच. पण मला ते मान्य नाही. मनानी मी स्त्री आहे. पुरुषी शरिरात असलेली एक संपूर्ण स्त्री"



हे त्यानी अत्यंत सभ्य भाषेत सांगितल. कुठेही घाण हावभाव नाही की घाण शब्द नाही. मी या माझ्या मैत्रिणीला एक स्त्री मानल. तीच्या सेक्स चॉईसला मान द्यावासा वाटला मला.



केतकी मद्रास युनिव्हर्सिटितुन इंग्रजीत MA झालेली होती. तीचं इंग्रजी आमच्या कॉलेजच्या प्रोफ़ेसर इतक चांगल व शाळेच्या इंग्रजीच्या बाईंपेक्षा कितीतरी चांगल होत. पण तीला कोणीच नोकरी द्यायला तयार नव्हत. समाजाचही बरोबर होतं.त्यांच्यावर असलेली संस्कारांची पुटं लगेच थोडीच जाणार होती ? एका हिजड्याला कधी नोकरी देतात का ? त्याला आपल्यासारख जगण्याचा काय अधिकार ?



माझ्याशी बोलताना ती सहजपणे म्हणाली "In school I was taught that we are masters of our own destiny. But life taught me that we are bound by it. And now what you see is my destiny. I must accept it."



हे ऎकल्यावर माझ्या पोटात कस तरी झाल.



पवई भागात ही मला नेहेमी दिसायची. जाता येता मी मुद्दम थांबुन तीच्याशी बोलायचो. तीला तेव्हढ्यानीसुद्धा बरं वाटायच. किती छोटी आपेक्षा. ती भिक मागत असायची. पण मी भिक दिली तर ती नाही घ्यायची. म्हणायची की "तू माझा मित्र आहेस. फ़क्त मित्रासारखाच रहा"



तीला भिक मागायची नसायची. काही व्यवसाय करायचा होता. तीला सकाळी पेपर घरोघर टाकण्याचा व्यवसाय दिला. पण लोकांना एक हिजडा सकाळी सकाळी दारात आलेला आवडत नव्हता.
तीनी स्टेशनरीच्या वस्तु गाडीत विकायचा व्यवसाय केला. पण तीच्याकडून लोक या वस्तु विकत घ्यायला तयार नसायचे व इतर हिजड्यांनी तीला हे विकताना पाहिल तर ते तीला खुप शिव्या द्यायचे.
कारण हिजड्यांच्या समाजानी हिजड्यांना जगण्यासाठी दोनच पर्याय समोर ठेवलेत एकतर स्वतःच शरिर घाण करायच आणि ऎडस्‌ पसरवायचा वा टाळ्या वाजवुन, शिव्या शाप देऊन भिक मिळवायची. तिसरा पर्याय नाही.



ती नंतर परत मद्रासला गेली. पुढे संपर्कच नाही,



हिजड्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्यामुळे यांच पुनर्वसन खुप कठिण जातं. एक असा गैरसमज आहे की हिजड्याच तोंड पाहिल की दिवस खराब जातो, त्यांना जादू टोणा चांगल्यापैकी माहिती असतो, त्यामुळे समाजानी यांना खुप दूर ठेवलेल आहे. त्याच्या वस्त्या ह्या वेश्या वस्त्यांच्या जवळ असतात.



काही वर्षांपूर्वीच हिजड्यांना कायद्याई मान्यता देऊन त्यांची मतदार म्हणून नोंदवणी केलेली आहे. त्यांना रेशन कार्ड मिळालेली आहेत. पण तरी हे काम खुप कमी पडत.



मी काही हिजडे हे खुप शिकलेले पाहिलेले आहेत. त्यांना शरिर विक्रयाचा व्यवसाय करायचा नसतो. भिकमागुन जगणं नको असत. त्यांना आपल्यासारख काही चांगल काम करायच असत. मेहनतीनी पैसे मिळवुन खायच असतं. आपेक्षा फ़ारच थोडी असते. पण ही माफ़क आपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग यांचा संबंध येतो तो वेश्या व गुन्हेगार यांच्याशी.



खर तर आपल्या स्वार्थाचा विचार केला तरी, आपल्या समाजाला सुरक्षित जिवन मिळाव यासाठी तरी यांच पुनर्वसन करण आवश्यक आहे.

ऑनलाईन ऎज्युकेशन





मनोहर खेड्यातला चुणचुणीत मुलगा. त्याला खुप शिकवाव अस आई-वडलांच्या मनात होत. गावात 10 वी पर्यंत शाळा होती. एकच शिक्षक सर्वांना शिकवत होते. शिक्षकांना शिकवण्याची फ़ारशी आवड नव्हतीच. कोणतीच नोकरी मिळत नाही म्हणुन मग त्यांनी ही नोकरी धरली होती. त्यांना मुलांना मारायला जास्त आवडायच. कोणा मुलानी काही त्रास दिला, वाजवीपेक्षा जास्त प्रश्न विचारले की त्या मुलाच्या कानफ़टात बसलीच म्हणुन समजा. मनोहर शिक्षकांनी दिलेला अभ्यास, गणितं लगेच पूर्ण करायचा. त्याच्या मनात अनेक प्रश्न यायचे. वारा वाहतो म्हणजे काय होत ? पाऊस पडतो तो पावसाळ्यातच का पडतो ? पक्षी उंच उडतो तेव्हा पंख हालवत असतो. पण विमान उंच उडताना त्याचे पंख हालत नाहीत मग ते विमान खाली का पडत नाही ? एक ना अनेक असे विचार त्याच्या मनात येत. शिक्षकांना विचारल तर मार खावा लागत होता. घरी आई-वडिल सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकत नव्हते. खर तर मनोहरच्या आई-वडलांना स्वतः पुढे शिकाव अस वाटत होत. पण या खेड्यात राहुन ते शक्य नव्हतं.

सुकृत शहरातला मुलगा. तसा हुशारच. शाळेत दिलेला अभ्यास नेमानी करायचा. धडेच्या धडे तोंड पाठ असायचे. शाळेत जाताना स्वच्छ युनिफ़ॉर्म असावा, इस्त्री केलेला असावा, बुटाला पॉलिश असाव या कडे शाळेच लक्ष असायच. शाळेत शिक्षिका छान छान कपडे करुन येत. ५ वा आयोग, ६ वा आयोग त्यांचा पगार वाढत होता व त्या बरोबर त्यांचा नट्टापट्टा सुद्धा वाढत होता. मुलांच्या कडुन धडे पाठ करुन घेतले की त्यांच काम पूर्ण होत होतं. सुकृतला आलेले प्रश्न तो आई-बाबांना विचारायचा, अथवा वर्ल्ड बुक मधुन स्वतःच शोधायचा.सुकृतच्या आई-वडलांना पुढे शिकायच होत. पण कामाच्या व्यापात त्यांना कॉलेजला जाण्यासाठी सलग वेळ मिळण शक्यच नव्हतं.

काही दिवसांनी दोघेही एकाच शहरात शिकायला आले. १०वी ला दोघांनाही चांगले मार्क मिळाले पण दोघांनाही शिक्षणाचा आनंद कधीच मिळाला नाही. अभ्यास करण याचा अर्थ पुस्तकं पाठ करण असाच त्यांना समजला. दोघेही परिक्षा जवळ आली की आभ्यासाला लागतात. वर्षभरात फ़ार तर फ़ार १-२ महिने अभ्यास करावा लागे. बाकी वेळ काहीच नाही "टाईम पास" (आयुष्यातला सर्वात वाईट शब्द). दोघांच्याही आई-वडलांची स्वतःची शिकण्याची उमेद संपली होती.
हे का झाल ? कदाचित दोघेही आयुष्यात चमकतील. तो ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे. पण जेव्हा त्यांना नविन शिकायची आवड होती, जिज्ञासा होती त्यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल नाही. त्यांच्या आई-वडलांना स्वतःला शिकायच होतं पण त्यांना तशी संधीच मिळाली नाही.

-------------------------------------------------------------------
याचाच अर्थ आपली आजची शिक्षण पद्दत कुठे तरी चुकते अस वाटत. आणि म्हणुनच वाढती लोकसंख्या व शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेता शिक्षण पद्दती व परिक्षा पद्दतीत बदल होण अपरिहार्य आहे.
-------------------------------------------------------------------

शहरातल शिक्षण व खेड्यापाड्यातल शिक्षण याच्या दर्जामध्ये बराच फ़रक असतो. त्यामुळे शहरातला ७० % मिळवलेला विद्यार्थी, हा खेड्यातल्या ८० % मिळावलेल्या मुलापेक्षा करिअर मधे बराच पुढे जातो. हा अनुभव अनेकांना आहे.
शिक्षणाचा खर्च, शिक्षकांचा दर्जा या सर्वाचा विचार करता, ओनलाईन परिक्षापद्दत जास्त योग्य वाटते. या पद्दतीत एखादा विषयाचा जाणकार शिक्षक संगणकावर ऑनलाईन शिकवतो. हे सर्व संबंधीत विद्यार्थ्यांच्या संगणकावर प्रक्षेपित होतं व यातुन दर्जेदार शिक्षण मिळु शकत. यात दुश्राव्य माध्यमांचा पुरेपुर उपयोग केलेला असल्यामुळे शिक्षण सोप जात.
गेले काही वर्ष ऑनलाईन एज्युकेशन बर्यापैकी लोकप्रिय झाल आहे. त्याची काही कारण अशी आहेत की

१ काही विद्यार्थ्यांना शाळा/ कॉलेज/ युनिव्हर्सिटीच्या कॅंपसमधे जाऊन शिक्षण घेणे शक्य नसते. याची अनेक कारण असतील

(अ) राहाण्याची जागा फ़ार दूर असेल, एखाच्या खेड्यात
(ब) कामाच्या व्यापात असा वेळ मिळाण शक्य नसेल

२. ऑनलाईन शिक्षणाच वेळा पत्रक ठराविकच असण्याची गरज नसते. त्यामुळे विद्यार्थी आपल्या मोकळ्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकतो. तो त्याचा पूर्णवेळ व्यवसाय सांभाळुनसुद्धा शिकु शकतो.

३. एक चांगली ओनलाईन डिग्री हे चांगली नोकरी मिळण अथवा प्रमोशन मिळण यासाठी उपयोगी पडते.

४. शारिरीक व्यंग अथवा शाळा/कॉलेजच्या कँपसला जाण्याची असमर्थता असलेल्यांना ओनलाईन एज्युकेशन ही एक पर्वणीच आहे.

जरी ओनलाईन शिक्षणात अनेक फ़ायदे असले तरी काही तोटे आहेतच

१. ऑनलाईन शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी हे प्रत्यक्ष एकमेकांना भेट्लेले नसतात वा प्रत्यक्ष पाहु शकत नसतात व त्या्मुळे शिक्षक-विद्यार्थी हा संबंध कधीच तयार होत नाही. याचा परिणाम शिक्षणावर होतो व विद्यार्थ्याला विषय नक्की समजला आहे का व समजला असला तर तो नक्की किती समजला आहे हे शिक्षकाला कधीच समजत नाही. काही चांगल्या ओनलाईन सॉफ़्टवेअरमधे विद्यार्थी शिकत असताना मधेच त्याला विषयासंबंधी प्रश्न विचारुन त्याला विषय नक्की समजला आहे का हे चाचपल जात. तसच विद्यार्थ्यीमधेच शिक्षकाला प्रश्न विचारुन आपल्या शंकांच निरसन करु शकतो.

२. अनेक विद्यार्थ्यांबाबत, लेक्चर ऎकत असताना मधेच त्या वरच लक्ष उडण व त्यामुळे चालू लेक्चर मधला काही भाग लक्षात न येण. हा प्रकार दिसतो. चांगला शिक्षक विद्यार्थ्याच्या चेहर्‍याकडे पाहुन त्याचं विषयामधे लक्ष आहे अथवा नाही हे ओळखु शकतो व आपल्या बोलण्याचा वेग कमी अधीक करुन विद्यार्थ्यांच लक्ष परत आपल्या बोलण्याकडे लागेल हे पाहात असतो. ही गोष्ट ओनलाईन शिक्षणाच्या बाबतीत शक्य नाही. माझ्यामते तरी विद्यार्थी पुरेसा परिपक्व झाल्याशिवाय त्याच्यासाठी ऑनलाईन शिक्षण ही पद्दत उपयोगी नाही याच हे एक मोठ कारण आहे.

३. विद्यार्थ्यांचा शिक्षक व बरोबरचे विद्यार्थी यांच्याशी संवाद होण फ़ार गरजेच असत. त्या साठी फ़ोरमचा उपयोग केला जाऊ शकतो.

------------------------------

ओनलाईन परिक्षा



आपली पुर्वीची पद्दत नक्कीच चांगली होती. त्यात प्रश्नांची सबजेक्टिव्ह उत्तर देण आपेक्षित होत. त्यामुळॆ मुलाला नक्की किती समजल आहे हे शिक्षकाला समजत होत. पूर्वी या प्रश्नांची उत्तर स्वतःच्या मनाची असावीत ही आपेक्षा होती. नंतर विद्यार्थांची संख्या वाढत गेली व पेपर तपासायचा शिक्षकांवरचा ताण वाढत गेला. आज २-३ मिनीटात संपूर्ण पेपर तपासुन शिक्षक हाता वेगळा करतो. यात विद्यार्थानी कस लिहिल आहे त्याला विषय़ समजला आहे का नाही याची चाचपणी करण अशक्य आहे. पेपर तपासनीसाला एक मॉडेल उत्तर पत्रिका दिली जाते व बहुतक परिक्षक त्याच प्रकारे उत्तराची आपेक्षा करतात. साहाजिकच पुस्तकातले परिच्छेद तसेच्या तसे पाठ करुन उतरवणं याकडे विद्यार्थांचा कल वाढत चालला. मी पाठांतराच्या विरोधात नक्किच नाही. जर विद्यार्थी विषय समजुन पाठ करत असेल तर ते नक्कीच चांगल आहे.

आता ८ वी पर्यंत मुलांना पास करणार म्हणल्यावर हाच लोड जास्त वाढणार. साहजिकच परिक्षापद्दतीत आमुलाग्र बदल आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्ह परिक्षा आपल्याला नव्या नाहीत. पण याची तपासणी संगणाका द्वारे करण याची आता गरज आहे. ही पद्दत नक्कीच पूर्ण योग्य नाही. पण ती जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो.

आपल्याकडे काही विषयांच्या ओनलाईन परिक्षा होतात. पण त्याच्या बाबत विद्यार्थी समाधानी वाटत नाहीत.

या परिक्षांमधे, संगणकात अनेक प्रश्न व त्याची उत्तर साठवून ठेवलेली असतात व हे प्रश्न विद्यार्थाला रॅंडमली विचारले जातात. त्यामुळे बाजु बाजुला बसलेल्या मुलांना वेगेवेगळे प्रश्न येतात. कॉपी करण्याचा प्रश्न येत नाही. व पेपर फ़ुटण्याचा सुद्धा प्रश्न नसतो.

या परिक्षेचा साधारण ठाचा असा असतो की एक प्रश्न व त्याची चार उत्तर दिलेली असतात व त्यातुन एक अथवा जास्त योग्य उत्तरं निवडायची असतात.

काही परिक्षांमधे विद्यार्थांना उत्तर पत्रिकेत ठराविक चौकोन पेन वा पेंसिलीनी पूर्ण भरायचा अस्तो. नंतर संगणक हा पेपर स्कॅन करुन त्याला तपासतो. ही पद्दत म्हणावी तेव्हढी बरोबर वाटात नाही कारण जर तो चौकोन भरताना काही चुक झाली तर त्या प्रश्नाचे मार्क कापले जातील.

काही परिक्षांमधे संगणाकावर ओनलाईन पेपर परिक्षेच्या आधी डाऊन्लोड केला जातो व हा त्या त्या विद्यार्थांसाठी ठरलेला पेपर त्याच्या नंबरानी स्टोअर केला जातो. यात प्रत्येक मुलाचा पेपर वेगळा असतो.

काही खुप चांगल्या तयार केलेल्या ओनलाईन परिक्षांना असलेले प्रश्न हे डायनॅमिकली बदलत असतात. उदाहरण द्यायच तर धडा क्र. ४ वर पहिल्यांदा ६ प्रश्न असतील. जर या प्रश्नांमधल २ पेक्षा जास्त उत्तर चुकली तर हा धडा परिक्षार्थीचा कच्चा आहे अस समजुन या धड्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. याचा अर्थ एखाद्या मुलानी कमीत कमी चुका करुन पेपर सोडवला असेल, तर त्याच्या साठी १५-२० प्रश्नांचीच परिक्षा असेल पण ज्या मुलानी अनेक चुका केल्यात, त्याच्या साठी ३०-३५ प्रश्नांची परिक्षा असेल.

याचा फ़ायदा असा होतो की विद्यार्थ्याला विषय नक्की समजला आहे की नाही हे सहज समजु शकत. मला वाटत की अशा प्रकारची परिक्षा असण जास्त गरजेच आहे.

आपण अशा परिक्षा व सध्याची परिक्षापद्दती यांची तुलना केल्यास

१. सध्याच्या परिक्षा : वर्षभर अभ्यास केल्यावर फ़क्त एका दिवसात त्या मुलाची संपूर्ण वर्षाची परिक्षा घेतली जाते. जर तो मुलगा परिक्षेच टेंशन घेत असेल, त्याला आधल्या रात्री झोप आलेली नसेल, काही आजारपण असेल अथवा टेंशन असेल तर त्याच्या त्या परिक्षेची पार वाट लागते.

ओनलाईन परिक्षा : या संगणकावर ओनलाईन असल्यामुळे वर्ष भरात केव्हाहि दिली तरी चालते व त्यामुळे विद्यार्थी जेव्हा परिक्षा देण्याच्या मानसिक अवस्थेत असतो तेव्हा तो या परिक्षा देऊ शकतो.

२. सध्याच्या परिक्षांचा सर्व साधारण पॅटर्न पाहु. १३० ते १४० मार्कांचा पेपर असतो. त्यात १०० मार्कांचा पेपर सोडवायचा असतो व ३३ % पासींग. याचा अर्थ आधीच मुलं ३०-४० मार्कांचा पोर्शन ओप्शनला टाकतात. याचा अर्थ जेव्हा एखाद्या मुलाला ३३% मार्क मिळावुन तो पास होतो, तेव्हा त्याला खर्‍या अर्थी ३३/१४० म्हणजेच २५% विषय समजलेला असतो. मी त्या मुलाला मिळणारे ग्रेस मार्क वा त्यानी कॉपी करुन मिळवलेल्या मार्कांचा विचार केलेला नाही. आता असा २५% विषय समजलेला विद्यार्थी पुढल्या वर्गात जातो. यातच आपल्या सध्याच्या परिक्षा पद्दतीत असलेली कमतरता दिसुन येते.

डायनॅमिकली बदलणार्‍या ऑनलान परिक्षांमधे पोर्शन ऑपशनला टाकायला चान्स नसतो. एखाद्या धड्यात विद्यार्थी कमजोर वाटला तर त्या धड्यावर जास्त प्रश्न विचारुन खरोखर विद्यार्थ्याला विषय समजला आहे का नाही याची चाचपणी केली जाते.

३. ओनलाईन पेपर हा एका लोकल भागासाठी तयार केलेला नसतो त्यामुळे कधी कधी त्यातली भाषा विद्यार्थ्यांना समजत नाही व त्यामुळे विषयाच ज्ञान असल तरी बरोबर उत्तर देता येत नाही.


निरंजन प्रधान