Monday, May 1, 2023

 

-------   या !   घर आपलंच आहे  --------

 

माझ कामच अस की गावोगाव फिराव लागत. गाडी भरदाव सोडायची, या गावाहुन त्या गावाला माल विकत फिरायच. विकलेल्या मालावर कमिशन मिळतं. बरं सुरु आहे.

 

असाच एका गावाला जात होतो, अंधार पडायला सुरवात झालेली होती. रस्ता तसा माहितीचा होता. 1 तासात गावात पोहोचणार होतो. तीथे राहायची सोय होती.

 

माझ्याच धुंदीत मी जात होतो आणि गाडी बंद पडली. काय करायच ? आजुबाजुला अंधार. गाडी बाजुला उभी करुन बॅग घेउन रस्त्यानी जायला लागलो. थोडा अंतरावर एक वाडा होता. तीथे गेलो. दरवाजात 4 वॉचमन पत्ते खेळत होते.

 

त्यांना विचारल "इथे राहायची सोय होईल का ? “ तर माझ्याकडे न बघता म्हणाले "आत जा, बाईंना विचारा"

 

आत गेलो. मोठा हॉल होता व त्याच्या एका कोपर्यात एक बाई केस विंचरत होती. मी थोडावेळ थांबलो, बाईंच काम झाल की विचारु असा विचार केला. बाई मन लावून केसात मध्यभागी भांग पाडत होत्या. पण त्यांना काही केल्या तो भांग जमत नव्हता.

 

त्या स्वतःशीच बोलल्या "आज काय झालय भांगच जमत नाही"

 

मग त्यांनी सरळ आपल डोक काढल व टेबलवर ठेवुन त्या भांग पाडायला लागल्या.

 

समोर भुत आहे म्हणल्यावर मी खुप घाबरलो. तसाच मागे फिरलो व धावत गेटपाशी आलो. वॉचमन पत्ते खेळत होते. पुर्ण गुंग झाले होते ते. जिवंत माणसं पाहुन किती धीर आला. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो

 

भाऊ आत भुत आहे" त्यांनी माझ्याकडे लक्षच दिल नाही. ते खेळात मग्न होते. मी परत सांगितल.

 

त्यातला एक जण वैतागला. म्हणाला "किती त्रास देता हो. आम्ही खेळतोय न ! बोला काय झाल ?”

 

मी सांगितल "आत बाई आहेत त्यांनी स्वतःचं डोक काढुन टेबलावर ठेवल"

 

तो म्हणाला " मग काय झाल ? ते काय कठीण आहे का ? हे बघा"

 

अस म्हणुन त्यानी आणि त्यापाठोपाठ खेळणार्या सर्वांनी आपआपली डोकी काढुन टेबलावर ठेवली.

माझ डोकच गरगरायला लागल. मी दोन्ही हातानी डोकं धरल. मी जागा आहे का झोपेत बघण्यासाठी केस धरून ओढले आणि माझ्या हातात माझ डोकं आल.

 

तुम्ही कधीही या वाड्याला भेट दिलीत तर आता तुम्हाला गेटपाशी पांच रखवालदार पत्ते खेळताना दिसतील. घाबरायचं बिलकुल नाही. सरळ आत यायचं.

 

राहायची सोय होईलच. कायमची.

 

--- निरंजन

 

Monday, June 27, 2016

पाऊस !

जोराचा पाऊस कोसळत होता. साथीला वारा होताच. मी खिडक्या लावायला सुरवात केली. शेवटची खिडकी लावताना, माझ रस्त्यावर लक्ष गेल. एक १०-१२ वर्षाची लहान मुलगी नुकतीच शाळेतुन आलेली असावी. पावसात मस्त भिजत होती. आकाशाकडे तीनी हात वर केलेल होते. आकाशाला आपल्या चिमुकल्या हातात तीनी कवटाळल होत व तोंड उघडुन ती पावसाच पाणी पित होती. या मुलीला जवळुन बघाव म्हणुन मी पटकन खाली आलो.

तीचे केस पुर्ण ओले झाले होते. दोन बटा कपाळावरुन गालावर चिकटलेल्या होत्या. चेहऱ्यावरुन पाणी खाली तीच्या हनवटीवरुन ओघळत होत. पाठीवरच दप्तर चिंब भिजल होत. शाळेचा गणवेश पुर्ण भिजला होता. पण या कशाचीच तीला शुद्ध नव्हती. ती आनंदानी या पावसाच स्वागत करत होती. तीच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनिय होता. चेहऱ्यावरची प्रत्येक रेष हासत होती. ओठाच्या कडेतुन फटणारं हे समाधानाच हास्य मोठ गोड दिसत होतं.

स्वतःच्याच आनंदात मश्गुल झालेली ती मुलगी आजुबाजुच जगच विसरली होती. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, कित्येक लोक येतायत जातायत. तीला कशाचच भान नव्हत. रस्त्यानी जोरात वाहात जाणाऱ्या पाण्यात तीची पावल पुर्ण बुडाली होती. जस जसा पाऊस वाढत होता, तस तसा तीच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढत होता. वरुण देव पण आपल्या या चिमुकल्या भक्ताच्या निरागस भक्तीनी सुखावला होता व पावसाचे टपोरे थेंब आकाशातुन पाठवुन तीला जास्त जास्त आनंदीत करत होता.

----------------------

मला माझ लहानपण आठवल. माझ घर घरासमोरच आंगण. माझ्याजवळ बसेला माझा आवडता कुत्रा. बाहेर पाऊस पडत होता. तुफान वारा होता. अंगणातल गवत वाऱ्याबरोबर डोलत होतं. पाऊस कोसळत होता. मी माझ्या नकळत आंगणात गेलो. माझा कुत्रा भुकुन मला घरात बोलवत होता. मी आकाशाकडे पाहिल व डोळे बंद करुन, हात वर करुन ते पाणी प्यायला लागलो. मी रोज ज्या झाडांबरोबर खेळत होतो त्यांना खुप आनंद झाला व ती जोरजोरात डोलायला लागली. पाण्याचा सपकारा माझ्या तोंडावर बसत होता. मला जास्तच आनंद होत होता. घोंघावणारा वारा माझ्या कानांमधे गोड गाणं गात होता

मी आसमंताशी पुर्ण एकरुप झालो होतो. बाजुच्या जांभळीच्या झाडानी पानावरुन ओघळणारे थेंब माझ्या अंगावर शिंपडले. मी त्याच्याकडे पाहिल त्यानी डोलता डोलता मला विचारल "मजा येते न ! उन्हाळ्यात किती शरीर तापल होत. आता कस शांत वाटतय" मी मानेनीच त्याला होकार दिला. बाकी झाडांनी डोलुन मला साथ दिली. माझ्या चिमुकल्या पायाखाली दबलेल्या गवतानी माझ्या पायाला गुदगुल्या केल्या. त्यालाही खुप आनंद झालेला होता. किती वेळ या समाधी अवस्थेत होतो माहिती नाही.
---------------------
मी भराभर मनानी लहान झालो. सगळ आजुबाजुच जग विसरलो. हात वर केले, डोळे बंद केले व त्या पावसाच मनापासुन स्वागत करायला लागलो. निसर्गाची जादू सुरु झाली. मी परत समाधीत गेलो. ते पावसाचे थेंब माझ्या गालावरुन ओघळत होते. माझ्या आईच्या हाताचा स्पर्ष होता त्यात. तो घोंघावणारा वारा मला सुखावत होता. रस्त्यानी खळाळत जाणारे ओघळ माझ्या पायाला गुदगुल्या करत होते.

तोच कोणी तरी म्हणल "काकांना वेड लागल आहे. आजारी पडतील तेव्हा समजेल" मी समाधी अवस्थेतुन झटकन वास्तवात आलो. मी म्हातारा आहे. असला थिल्लरपणा करायला नको. धावत वर घरात गेलो. दार लावल. टॉवेल घेऊन डोक पुसल. परत खिडकीत आलो. समोर ती मुलगी होती. आता ती व तीच्या मैत्रिणी घरी जात होत्या. एका ठिकाणी थोड पाणी तुंबलेल होत. तीनी त्या पाण्यात बदकन उडी मारली. पाणी मैत्रिणींवर उडाल. त्या किंचाळल्या व त्यांची फजिती बघुन ती मुलगी खदखदुन हासली.

मी खिडकी बंद केली. ओले कपडे बदलले व स्वैटर चढवला. आता मी मनानीही म्हातारा झालो. मन म्हातार झाल्यावर शरीर दुप्पट वेगानी म्हातारं झाल व मला दोन तीन शिंका आल्याच.





Sunday, June 26, 2016

अदृष्य


वासंती भराभर काम उरकत होती. लहान अनुप झोपला होता तोवर काही कामं उरकण आवश्यक होत. आज अमोलबरोबर शॉपिंगला जायच होत. पुढच्या महिन्यात चार पाच नात्यातली लग्न होती. हा टॉमी पण सारखा पाया पायात येत होता. वासंतीनी टॉमीला जवळ घेतल त्याची पापी घेतली.

टॉमी बाळा, आय लव्ह यु ! सारखा पाया पायात येऊ नकोस"

टॉमीवर ती मुलासारख प्रेम करत होती. तीनी अनुप झोपलेला होता त्याच्या कॉटच्या जळच टॉमीला बांधुन ठेवल व म्हणाली

"टॉमी, अनुपकडे लक्ष ठेव बर का ! तुझा लहान भाऊ आहे न तो. त्याची दुधाची वेळ झाली की तो उठेल. तो पर्यंत भुकुन भुकुन त्याला उठवु नकोस"

टॉमीला लगेच समजल. खुप समजुतदार कुत्रा होता तो. त्यानी आपली गळयातली साखळी पायानी नीट केली व थोडा वेळ मान पायानी खाजवुन तो मागच्या पायावर बसुन व जिभ बाहेर काढुन आपल्या लहान भावाकडे बघत बसला. अनुप जागा झाला की त्याच्याशी खेळणार होता तो.

वासंतीनी काम उरकल. कपडे बदलले. गरम केलेल दूध तोवर थोड थंड झालेल होत. तीनी ते बाटलीत भरल व बेडरुममधे आली. त्या मोठ्या बेडरुमच्या एका बाजुला बेड होता. तीला अनुप दिसला. तो नुकताच जागा झाला व उपडा झाला. नुकताच अनुप उपडा होऊन सरपटायला लागलेला होता. वासंती म्हणाली

अनु, थांब पडशील" ती झटपट बेडजवळ येत होती. तेव्हढ्यात आईकडे बघत अनुप सरपटत पुढे आला व बेडवुन पडला
वासंती
अग बाई" अस किंचाळुन पुढे झाली पण काही वेगळाच प्रकार झाला होता. पडणारा अनुप अदृष्यझाला होता.
अनु ....”

अस मोठ्यानी किंचाळुन वासंती त्याला शोधायला लागली. पण अदृष्य झालेला अनुप तीला दिसत नव्हता. त्याचा आवाज मात्र एेकायला येत होता. वासंती रडायला लागली. तीच रडण एेकुन शेजारीण धावली. एकुण प्रकार पाहिल्यावर त्या शेजारणीनी सगळी सुत्र आपल्या हातात घेतली. वासंतीच्या नवऱ्याला अमोलला फोन करुन ताबडतोब घरी बोलावल. जवळच्या पोलिस स्टेशनला फोन करुन त्यांना वर्दी दिली आणि अनुपला शोधायचा आपल्या परीनी प्रयत्न सुरु केला.
वासंती घायमोकलुन रडत होती. टॉमी सारखा भुकत होता. साखळीला हिसके देत होता.

एक तगडा पोलिस इंस्पेक्टर, एक हाडकुळा पण तरतरीत हवालदार थोड्याच वेळात पोचले. त्यांच्या पाठोपाठ धावत धावत अमोल येऊन पोचला. अमोलला पाहिल्यावर वासंतीनी त्याला मिठी मारली व रडतरडत काय झाल ते सांगितल. इंस्पेक्टरनी कॉंस्टेबलला खुण केली व त्यानी सर्व घरभर फेरी मारुन काही अनुचित दिसत नाही हे पाहिल. आता अनुपच्या भुकेची वेळ झालेली होती. तो मोठ्यानी रडायला लागला. सर्वांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज तर एेकायला येत होता पण अनुप दिसत नव्हता. अनुपच रडण एेकुन वासंती व अमोल दोघेही रडायला लागले. शेजारीणीलाही अनुपचा खुप लळा होता. ती पण रडत होती. पोलिसांना काहीच समजत नव्हत करायच काय. पंचनामा तरी काय करणार ? काय झाल याची माहिती पण कोणी नीट देत नव्हत. तरी थोड थोड विचारुन पंचनामा तयार केला. नुसत बघत बसण्याशिवाय हातात काहीच नव्हत.

हवालदार वैतागला होता. मुलाच्या रडण्याचा आवाज, बाई घायमोकलुन रडते, तीचा नवरा रडतोय. हे कमी होत म्हणुन हे कुतरडं मोठ्या मोठ्यानी भुकतोय. आज सकाळीच त्याला साहेबांनी कारण नसताना जाम शिव्या दिलेल्या होत्या. आता डबा उघडुन जेवणार तर ही केस आली. जाम वैतागला होता बिचारा. त्यानी विचार केला निदान या कुत्र्याची साखळी सोडु. तो बाहेर जाईल. एक आवाज बंद होईल.

त्यानी कुत्र्याला सोडल व कुत्र्यानी एकदम झेप घेतली.

हवालदारानी जाऊन टॉमीची साखळी सोडली व टॉमीनी धावत जाऊन झेप घेतली. ज्या ठिकाणाहुन अनुप गायब झाला होता तीथुनच टॉमी पण गायब व्हायला लागला. वासंतीनी ते पाहिल. एक मुल तर गायब झालच आहे. आता हे दुसर बाळ गायब होतय. तीनी "टॉमी...” असा टाहो फोडुन झेप घेतली व टॉमीची तंगडी पकडली. टॉमी पुर्ण गायब झाला व वासंती पण कंबरेपर्यंत अदृष्य झाली. अमोलनी “वसु...” अस ओरडुन तीची तंगडी पकडली. वासंती गायब झाली व अमोल पण गायब होत होता. हवालदारानी पटकन अमोलची तंगडी पकडली. अमोल गेला व हवालदार पण गायब व्हायला लागला. इंस्पेक्टर उठला. म्हणाला. “त्यांना मरु दे. तू कशाला जातोस" अस म्हणुन त्यानी हवालदाराची तंगडी पकडली व त्याला जोरात ओढल.

हवालदार बाहेर आला. त्याच्या हातात अमोलची तंगडी. अमोल बाहेर आला. त्याच्या हातात वासंतीची तंगडी. वासंती बाहेर आली. तीच्या हातात टॉमीची तंगडी व टॉमी बाहेर आला त्याच्या तोंडात अनुचा पाय. अनुप बाहेर आला व रडायला लागला.

------------------------------

मित्रांनो ही आहे आईनस्टाईननी मांडलेली रीलेटिव्हीटी (सापेक्षता) ची थिअरी. आपण त्रिमिती जगाचा विचार करतो. प्रत्येक पदार्थाला लांबी, रुंदी व उंची आहे. या झाल्या तीन मिती. पण यालाच जर आपण काळ ही एक मिती जोडली तर होईल चतुर्मीती जग. आपण अशा जगात राहतो. काळाबरोबर आपण पुढे पुढे जात असतो. गेलेला मागचा क्षण आपण पाहु शकत नाही. पण तो गेलेला क्षण तर असतोच न. फक्त आपल्याला तो दिसत नाही इतकच. एकाच वेळी दोन अश्या सृष्टी एकाच ठिकाणी अस्थित्वात असु शकतात. कधी कधी अपघातानी एखाद्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात. आपल्याला दूसऱ्या सृष्टीतल काहीच दिसत नाही. ज्या ठिकाणी या दोन सृष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी आपल्याला त्या सृष्टीतली माणसं दिसु शकतात. यालाच कदाचित भुत म्हणत असतील. अशा ठिकाणाहुन आपला अनुप दूसऱ्या जगात निघुन गेला होता. कुत्र्याला सहाव इंद्रिय आहे म्हणुन अथवा तो ज्या ठिकाणी बांधलेला होता तिथे दोन्ही सृष्टी दिसत असतील. त्याला त्या सृष्टीत गेलेला व तीथे सरपटत आपल्यापासुन लांब जाणारा अनुप दिसत होता. बाकी कथा तर आपल्याला माहितीच आहे.
मी माझ्याकडुन या कथेच स्पष्टीकरण दिल. ते तुम्हाला कदाचित पटल नसेल. रिलेटिव्हीटी हा खुप मोठा विषय आहे. ती चतुर्मिती जगत इतकच देऊन थांबता येत नाही. तुम्हाला या कथेबाबत काही मत मांडायच असेल. समजलेल्या वा आधीच माहिती असलेल्या रिलेटिव्हिटी थिअरी बाबत काही मत मांडाव व थोडी तरी चर्च्या करावी ही आपेक्षा आहे.