------- या ! घर आपलंच आहे --------
माझ कामच अस की गावोगाव फिराव लागत. गाडी भरदाव सोडायची, या गावाहुन त्या गावाला माल विकत फिरायच. विकलेल्या मालावर कमिशन मिळतं.
बरं सुरु आहे.
असाच एका गावाला जात होतो, अंधार पडायला सुरवात झालेली
होती. रस्ता तसा माहितीचा होता. 1 तासात गावात पोहोचणार होतो.
तीथे राहायची सोय होती.
माझ्याच धुंदीत मी जात होतो आणि गाडी बंद पडली. काय करायच ? आजुबाजुला अंधार. गाडी बाजुला उभी करुन बॅग घेउन रस्त्यानी जायला लागलो. थोडा अंतरावर एक वाडा होता. तीथे गेलो. दरवाजात 4 वॉचमन पत्ते खेळत होते.
त्यांना विचारल "इथे राहायची सोय होईल का ? “ तर माझ्याकडे न बघता म्हणाले "आत जा, बाईंना विचारा"
आत गेलो. मोठा हॉल होता व त्याच्या एका कोपर्यात एक बाई केस विंचरत होती.
मी थोडावेळ थांबलो, बाईंच काम झाल की विचारु असा विचार केला. बाई मन
लावून केसात मध्यभागी भांग पाडत होत्या. पण त्यांना काही केल्या तो भांग जमत
नव्हता.
त्या स्वतःशीच बोलल्या "आज काय झालय भांगच जमत नाही"
मग त्यांनी सरळ आपल डोक काढल व टेबलवर ठेवुन त्या भांग पाडायला लागल्या.
समोर भुत आहे म्हणल्यावर मी खुप घाबरलो. तसाच मागे फिरलो व धावत गेटपाशी आलो. वॉचमन पत्ते खेळत
होते. पुर्ण गुंग झाले होते ते. जिवंत माणसं पाहुन किती धीर आला. मी त्यांच्या जवळ
गेलो आणि म्हणालो
“भाऊ आत भुत आहे" त्यांनी माझ्याकडे लक्षच दिल नाही. ते खेळात मग्न
होते. मी परत सांगितल.
त्यातला एक जण वैतागला. म्हणाला "किती त्रास देता हो. आम्ही खेळतोय न
! बोला काय झाल ?”
मी सांगितल "आत बाई आहेत त्यांनी स्वतःचं डोक काढुन टेबलावर
ठेवल"
तो म्हणाला " मग काय झाल ? ते काय कठीण आहे का ? हे बघा"
अस म्हणुन त्यानी आणि त्यापाठोपाठ खेळणार्या सर्वांनी आपआपली डोकी काढुन
टेबलावर ठेवली.
माझ डोकच गरगरायला लागल. मी दोन्ही हातानी डोकं धरल. मी जागा आहे का झोपेत
बघण्यासाठी केस धरून ओढले आणि माझ्या हातात माझ डोकं आल.
तुम्ही कधीही या वाड्याला भेट दिलीत तर आता तुम्हाला गेटपाशी पांच रखवालदार
पत्ते खेळताना दिसतील. घाबरायचं बिलकुल नाही. सरळ आत यायचं.
राहायची सोय होईलच. कायमची.
--- निरंजन